Accident : काकांच्या अंत्यविधीहून परतताना काळाचा घाला! 'समृद्धी'वर चौघा भावांचा मृत्यू | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Accident : काकांच्या अंत्यविधीहून परतताना काळाचा घाला! 'समृद्धी'वर चौघा भावांचा मृत्यू

दूधड : काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून परतत असलेल्या भावंडांवर काळाने घाला घातला.ही मन सुन्न करणारी घटना बुधवारी (ता.२४) सकाळी समृद्धी महामार्गावर घडली.राजणभाई गौड (वय ४३) कृष्णा राजणभाई गौड (वय ४४) श्रीनिवास रामू गौड (वय ३८) सुरेशभाई गौड (वय ४१) (सर्व रा. लेफ सिटी करडवा, सुरत, गुजरात)असे अपघातात मयत झालेल्या भावंडांची नावे आहेत.

याविषयी सविस्तर माहिती अशी की (सुरत गुजरात) येथील रहिवासी गौड कुटुंबीय हे कपड्याचा व्यवसाय करतात.दोन दिवसापुर्वी नातलगातील तेलंगणा येथे वयवृध्द काकाचा मृत्यू झाला होता. काकांच्या अंत्यविधीसाठी चारही भावंडं अर्टिगा (एजे ०५ आर.एन ८४५०) ने तेलंगणा येथे गेले होते.

अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून सुरतकडे परतत असताना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास समृद्धी महामार्गावर महामार्ग क्रमांक ४०६ (ता. छत्रपती संभाजीनगर) वरझडी- जयपूर गावाजवळ येताच चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकावर जावून आदळली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी झाला होता.

मात्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल करेपर्यंत त्यांचीही प्राणज्योत मावळली होती.दरम्यान गाडीत मागे बसलेला भार्गव सुरेश गौड (वय १९) हा किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले, सुनील गोरे हे करीत आहेत.अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने गौड कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.