भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

हिंगोली ः येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भिमराव पतंगे उर्फ आबा (वय ६४) यांचे मंगळवारी (ता.११) पहाटे पाच वाजता पुणे-मुंबई मार्गावर लोणावळाजवळ अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे नेले जात असतांना रुग्णावहिकेला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. 

हिंगोली ः येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भिमराव पतंगे उर्फ आबा (वय ६४) यांचे मंगळवारी (ता.११) पहाटे पाच वाजता पुणे-मुंबई मार्गावर लोणावळाजवळ अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे नेले जात असतांना रुग्णावहिकेला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. 

कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील पतंगे हे काही दिवसापुर्वी मॉर्निंग वॉकला जात असतांना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीमधे सुधारणा होत नसल्याने त्यांना उपचारासाठी मुंबई येथील बाँम्बे हॉस्पीटलमधे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रात्रीच त्यांना नांदेडवरून रुग्णवाहिकेद्वारे मुंबई येथे नेले जात होते. त्यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुणे-मुंबई मार्गावर लोणावळ्या जवळ आली असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या रुग्णवाहिकेला धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. रात्री दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

वारंगाफाटा येथून पत्रकारीता क्षेत्रात काम केल्यानंतर श्री. पतंगे यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपामधे सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतांना वेगळी छाप पाडली होती. त्यानंतर त्यांची पक्षाने जिल्हाध्यक्षपदीही नियुक्ती केली होती. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांना परिसर ‘आबा’ नावाने ओळखत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांचे ते भाऊ होत.

Web Title: Accidental Death of Former BJP MLA