बँकेत मुदत ठेवीचे पैसे मिळत नसल्याने खातेदाराचा तणावातून मृत्यू

तानाजी जाधवर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

बुधवारी (ता. 20) सुध्दा ते बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते, त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याचा धक्का त्यांना बसला. त्यातच त्यांना ह्रद्य विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदत ठेवीचे पैसे मिळत नसल्याने खातेदाराचा मानसिक तणावातून ह्रदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. ही रक्कम त्वरीत मिळावी या मागणीसाठी कुटुंबियांनी खातेदार असलेले गुलाब पारशेट्टी यांचा मृतदेहच जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसमोर ठेवला. यावेळी बँकेच्या प्रशासनाल उपस्थित समुदायांनी चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. 

याविषयी अधिक माहिती अशी की, गुलाब पारशेट्टी (रा. गणेशनगर उस्मानाबाद) हे एस.टी. महामंडळामध्ये चालक या पदावरुन निवृत्त झाले. त्यावेळी त्यानी आपली सगळी जमापुंजी जिल्हा बँकेमध्ये मुदत ठेव म्हणुन ठेवली होती. ही रक्कम जवळपास पंधरा लाखाच्या घरात होती. पण जेव्हा ही रक्कम काढायची वेळ आली तेव्हा त्यांना ती काही हजारामध्ये मिळत होती, यामुळे ते मानसिक तणावात असल्याचे कुटुंबियानी सांगितले. बुधवारी (ता. 20) सुध्दा ते बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते, त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याचा धक्का त्यांना बसला. त्यातच त्यांना ह्रद्य विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातून नातेवाईकाने त्यांचा मृतदेह थेट जिल्हा बँकेच्या दारात आणला.

यामुळे प्रशासनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते, आलेल्या जनसमुदायाला शांत करण्यासाठी प्रशासनाने ही रक्कम परत देण्याचे लेखी आश्वासन दिले.

लेखी आश्वासनामध्ये त्यानी सांगितले की, तीन टप्प्यामध्ये उर्वरीत पाच लाख 58 हजार रुपयाची रक्कम दिली जाईल. तसेच या अगोदर नऊ लाख 37 हजार रुपये खातेदारांना दिलेली असल्याची माहिती त्यामध्ये दिली आहे. पण या प्रकरणाची जोरदार चर्चा जिल्ह्यामध्ये सूरु झाली आहे, सोशल मिडीयावर या प्रकरणात जिल्हा बँकेवर चौफेर टिका होताना दिसत आहे.  लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी सामंजस्यांची भुमिका घेत मृतदेह घराकडे नेले.

Web Title: The account holder has died from stress due to non payment of fixed deposits in the bank