रुग्णालयातून पळालेल्या आरोपीस विमानात पकडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नांदेड - हाणामारीत जखमी आरोपी उपचार घेत असताना अटकेच्या भीतीने रुग्णालयातून पळाला. त्याने थेट विमानतळ गाठले. याबाबतची माहिती कळताच पाठलाग करत पोलिसांनी त्याला विमानातून अटक केली. पळून जाणारा आरोपी हा आमदार तारासिंग यांचा नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले. येथील श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळावर बुधवारी (ता. एक) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा थरार घडला.

येथील गुरुगोविंदसिंगजी वस्तुसंग्रहालयात रवींद्रसिंग गुरुबक्षसिंग लांबा (वय ४८, रा. मुंबई) हे कार्यरत होते. त्यांचा काही कारणावरून मनिंदरसिंग रामगडिया यांच्यासोबत वाद झाला. या वादातून रवींद्रसिंग यांच्या पायाला जबर दुखापत झाली. मनिंदरसिंग यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जखमी रवींद्रसिंग लांबा यांना कौठा परिसरातील यशोसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘आम्ही सांगितल्याशिवाय डिस्चार्ज देऊ नका’ असे पोलिसांनी रुग्णालयाला पत्राद्वारे कळविले होते. पोलिस अटक करतील, या भीतीने रवींद्रसिंग काल रात्रीपासूनच बेचैन होता. आज सकाळ होताच ‘मी विमानाने मुंबईला जाणार’ असे तो शेजारच्या रुग्णाशी सहज बोलून गेला. त्यानुसार सकाळी दहाच्या सुमारास तो रुग्णालयातून पळाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी फौजदार विक्रांत हराळे यांना कळविले. श्री. हराळे यांनी तत्परतेने बुलेटवरून विमानतळ गाठले. तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना कल्पना दिली व विमान उड्डाण होऊ देऊ नका, त्यात आरोपी लपल्याचे सांगितले. त्यानुसार संबंधितांनी कार्यवाही केली. विमानतळावर गेल्यानंतर रवींद्रसिंग लांबा हा ‘ट्रु जेट’च्या नांदेड - मुंबई विमानात ‘आर. सिंग’ या नावाने प्रवासासाठी बसला होता. श्री. हराळे व विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला विमानातून अटक केली. त्यानंतर रवींद्रसिंगला वजिराबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

Web Title: accused escaped from the hospital were caught on the plane