बलात्कारी अपघातात ठार, पीडितेचा पतीने केला खून 

photo file
photo file

केज (जि. बीड) ः केज तालुक्‍यातील विडा येथील बलात्काराच्या आरोपात जामीन मिळाल्यानंतर कोठडीतून दोनच दिवसांपूर्वी बाहेर आलेल्या संतोष दगडू वाघमारे (वय 35) या आरोपीचा रविवारी (ता. 22) रात्री अपघातात मृत्यू झाला. संतोषवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या कविता सहदेव वायबसे या पीडितेचाही सोमवारी सकाळी मृतदेह आढळून आला. दोन्ही घटना काही वेळेच्या फरकाने व सहा किलोमीटर अंतरावर घडल्या. 

तालुक्‍यातील नामेवाडी येथील कविता वायबसे हिने विडा येथील संतोष दगडू वाघमारे याच्याविरोधात 28 ऑगस्टला बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. या आरोपात पोलिसांनी अटक केल्यानंतर कोठडीत असलेला संतोष वाघमारे दोनच दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. तो रविवारी केजहून विडाकडे येत असताना मस्साजोगजवळ दुचाकी व टमटममध्ये झालेल्या अपघातात संतोषचा मृत्यू झाला. यानंतर सोमवारी सकाळी शिंदी फाटाजवळ कविता वायबसे या महिलेचा मृतदेह आढळून आला. 

संतोषच्या घातपाताचा संशय 
संतोष वाघमारे याचा मृत्यू अपघाती झाला नसून तो घातपात असल्याचा संशय व्यक्त करत त्यादृष्टीने तपास करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली. अपघातानंतर नातेवाइकांनी केज पोलिस ठाण्यात जाऊन तशी मागणी केली. दरम्यान, त्याच्या उत्तरीय तपासणीनंतर प्रकार समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. संतोष वाघमारे याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू असतानाच सुनीता वायबसे हिचा मृतदेह आढळला. 

पतीच निघाला खुनी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या 
सोमवारी मृतदेह सापडलेल्या कविताचे संतोष वाघमारेसोबत अनैतिक होते. भांडणानंतर मारहाणीमुळे तिने संतोषवर बलात्काराचा आरोप केला होता. दरम्यान, कविताचा खून पती शहादेव वायबसे यानेच केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. केज पोलिसांनी शहादेवला अटक केली. 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातीलच नामेवाडी येथील कविताला पती शहादेव सतत मारहाण करत असे. दरम्यान, संतोष वाघमारे हा ऊसतोडणी मुकादम होता. पतीसह ती कारखान्यावर गेल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ते दोघे केजमध्ये समतानगर भागात किरायाने खोली करून राहत होते. दरम्यान, 28 ऑगस्ट रोजी कविता व संतोष यांच्यात भांडण झाल्यानंतर तिने बलात्कार केल्याची फिर्याद दिली. त्यावरून संतोषवर गुन्हा नोंद झाला. त्यानंतर कोठडीत असलेला संतोष दोन दिवसांपूर्वी जामिनावर सुटल्यानंतर रविवारी त्याने कविताला भेटण्यासाठी मस्साजोगला बोलावले. मात्र, तेथेही दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संतोष रागाच्या भरात जात असताना त्याची दुचाकी रिक्षाला धडकून तो ठार झाला. यानंतर कविताने पती शहादेव याच्याकडे मदत मागितल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला व तिचा मृतदेह शिंधी ते विडा रस्त्याच्या कडेला टाकून दिली. तिचा स्कार्फने गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले. पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, सहायक पोलिस निरीक्षक श्री. मुंडे यांच्या पथकाने तपास केला व सहदेव यास अटक केली. 

...म्हणून केला खून 
सहदेव आश्रुबा वायबसे हा अकरा वर्षांचा असताना त्याचा कवितासोबत बालविवाह झाला होता. कविता शहादेवपेक्षा चार वर्षांनी मोठी होती. तिचे संतोष वाघमारे याच्याशी प्रेमसंबंध आल्याने ती शहादेवला सोडून जाऊन संतोषसोबत राहत होती. कविताच्या विवाहित मुलीच्या सासरच्यांकडूनही नेहमी या प्रकाराबाबत चिड व्यक्त होत असल्याने शहादेवच्या मनात कविताबद्दल राग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com