घरभाड्यावरून झालेल्या वादातून ऍसिड हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

किरायाचे पैसे मागणाऱ्या घरमालकाला बेदम मारहाण करुन दोघांनी ऍसिड फेकले. यात गंभीर जखमी झालेल्या घरमालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले 

उमरगा (जि.उस्मानाबाद) : घरभाड्यावरून झालेल्या वादातून भाडेकरूसह दोघांनी मारहाण करून अंगावर ऍसिड फेकल्याने गंभीर जखमी झालेल्या रमालकाचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताचा भाऊ लहू मुरमे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरूम पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता. दोन) प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 

किरायाचे पैसे देतो, म्हणून बोलावून घेतले 
याबाबत अधिक माहिती अशी, की मुख्याध्यापक हनुमंत शिंदे हा दाळिंब (ता. उमरगा) येथे अंकुश मुरमे यांच्या घरात किरायाने राहत होता. 11 नोव्हेंबरला श्री. मुरमे हे हनुमंत शिंदे यांच्या घरी किरायाचे पैसे आणण्यासाठी गेले होते. त्याच दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास शिंदे याचा साथीदार दयानंद देवकते (रा. दाळिंब) यांनी अंकुश मुरमे यांना अडवून "तू घरभाडे मागण्यासाठी शिंदे यांच्या घरी का गेला' असे म्हणत दमदाटी केली.

कोण म्हणाले - हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्या 

तसेच त्याच रात्री शिंदे व देवकते या दोघांनी अंकुश मुरमे यांना किरायाचे पैसे देतो, असे सांगून बोलावून घेतले. मात्र पैसे न देता लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत त्यांच्या अंगावर ऍसिड फेकले. गंभीर जखमी झालेल्या अंकुश मुरमे यांना नातेवाइकांनी उमरगा येथे प्राथमिक उपचार करून लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले होते. मात्र उपचारादरम्यान 24 नोव्हेंबरला दुपारी त्यांचा मृत्यू झाला. 

पालकांनो, हे वाचा - मुलं ब्रेकफास्ट करीत नाहीत, शिक्षणावर होतोय परिणाम

याप्रकरणी मृताचा भाऊ लहू मुरमे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. 25 नोव्हेंबरला प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी (ता. दोन) प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश एस. एस. चव्हाण यांनी हनुमंत शिंदे व दयानंद देवकते या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acid attack from the argument