लातूर जिल्ह्यातील 26 स्कूल व्हॅन अन्‌ 6 स्कूल बसवर कारवाई

लातूर : शहरात आणि जिल्ह्यात बेकायदेशिरपणे वाहतूक करणारी शालेय वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अटकावून ठेवली आहेत.
लातूर : शहरात आणि जिल्ह्यात बेकायदेशिरपणे वाहतूक करणारी शालेय वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अटकावून ठेवली आहेत.

लातूर : विद्यार्थ्यांची बेकायदेशिरपणे वाहतूक करणाऱ्या शालेय वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) करडी नजर ठेवली आहे. त्यातूनच गेल्या चार दिवसांत शहरासह जिल्ह्यातील 26 स्कूल व्हॅन अन्‌ 6 स्कूल बसवर कारवाई करून ही वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, ज्यांचे शालेय वाहतूकीचे परवाने आधीच निलंबित करण्यात आले आहेत, अशी वाहनेही विद्यार्थ्यांची वाहतूक करताना पोलिसांना आढळून आली आहेत. त्यांच्यावरही कडक कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. 

नियमांचे पालन नाही
स्कूल बस आणि स्कूल व्हॅनकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील नियमांचे पालन होत नाही, अशा तक्रारी पालकांकडून वाढत आहेत. त्यामुळे बेकायदेशिर आणि अवैध शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिले आहेत. सध्या राज्यभरात ही कारवाई सुरू आहे. लातूरातही गेल्या चार दिवसांपासून आरटीओच्या वायू वेग पथकाच्या माध्यमातून बेकायदेशिर वाहतूक करणाऱ्या शालेय वाहनांवर कारवाई केली जात आहे. 

अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात
लातूर शहरासह उदगीर, अहमदपूर या तालुक्‍यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एकूण 32 वाहनांवर कारवाई करून ही वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत. यात विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने, परवाना निलंबित केलेली वाहने, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे... अशा वाहनांचा समावेश आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वायू वेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग, राजू नागरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नितेश उमाळे, सुजित गाढवे यांनी ही कारवाई केली. 

15 ते 20 हजार रुपयांपर्यंत दंड
शालेय वाहनांना प्रत्येकी 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. तर काहींचा वाहतूक परवाना निलंबित केला जात आहे. याशिवाय, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट नसणे, सीट बेल्ट न लावणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे अशा विविध गुन्ह्यातील एकूण 110 वाहनांवर गेल्या चार दिवसांत दंडात्मक कारवाई करत 71 वाहने अटकून ठेवण्यात आली आहेत, असेही आरटीओकडून सांगण्यात आले. 

घ्या दक्षता 
बेकायदेशिरपणे वाहतूक करणाऱ्या शालेय वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहिम यापुढेही आठवडाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आणि मालकांनी आवश्‍यक कागदपत्रे जवळ बाळगावीत, असे आवाहन आरटीओ तर्फे करण्यात आले आहे. यात वाहनचालकाचा परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, आसनक्षमता, हॅण्डल, आप्तकालिन दरवाजा, दप्तर ठेवण्याची जागा... या बाबी वायू वेग पथकाकडून तपासल्या जाणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com