औरंगाबाद : बसपच्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

योगेश पायघन
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पक्षादेश झुगारल्याचा ठपका ठेवत पाच नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

औरंगाबाद - नुकत्याच झालेल्या जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने (बसप) औरंगाबाद महापालिकेतील आपल्या पाचही नगरसेवकांना मतदानाला न जाण्याचा व्हिप बजावला होता. मात्र, या सर्व नगरसेवकांनी तो नाकारत मतदान केल्याने पक्षाने पक्षादेश झुगारल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

औरंगाबाद महापालिकेत बहुजन समाज पक्षाचे पाच नगरसेवक आहेत. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या सर्व नगरसेवकांना मतदानादरम्यान गैरहजर राहावे असे स्पष्ट आदेश पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी या सर्व नगरसेवकांनी पक्षादेश झुगारत मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. त्यानंतर संबंधित नगरसेवकांचा अहवाल बसपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार रविवारी (ता. 25) मुंबई येथील बसपा भवनात प्रदेश समितीची बैठक घेण्यात आली. केंद्रीय महासचिव रामअचल राजभर, खासदार अशोक सिध्दार्थ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्या उपस्थित या पाचही नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
यांच्यावर झाली कारवाई 
बसपाचे जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे नगरसेवक राहुल सोनवणे, सुनिता चव्हाण, प्रेमलता दाभाडे, विजया बनकर व भारती सोनवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे कळवले आहे. तसेच संबंधित नगरसेवकांना त्यांची पक्षातुन हकालपट्टी केल्याचा निरोप फोनवरून देण्यात आल्याचे सचिन बनसोड यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken on BSP Corporator