‘या’ शहरातील नागरिकांवर होणार कारवाई

file photo
file photo

नांदेड :  केंद्र आणि राज्य सरकारतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येत असले तरी अजूनही काही ठिकाणी नागरिकांच्या वाईट सवयी मोडल्या नाहीत. त्यामुळे जनजागृती करण्यासोबत आता रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, घाण करणाऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय नांदेड महापालिकेने घेतला आहे. या आधीही ही मोहिम राबविण्यात आली होती आता पुन्हा अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.


सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अतिक्रमण करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा, घाण टाकणे, रस्त्यावर थुंकणे किंवा लघुशंका करणे, उघड्यावर शौच करणे यासह इतर अनेक प्रकार शहरात सातत्याने घडत आहेत. त्यामुळे अस्वच्छता होत असून त्याची अडचण अनेकांना होते. त्याचबरोबर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होत असली तरी त्यांना दंड आकारण्यात येत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम नांदेड शहरातील वाहतूक कोंडीवर होत आहे.


महापालिकेने या महत्त्वाच्या नियमांचे पालन करून त्या बाबत कडक कारवाई केली आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर निश्चितच नागरिकांनाही शिस्त लागेल. त्याचबरोबर या बाबतची जनजागृतीही आवश्यक आहे. अशा प्रकारची कारवाई महापालिकेने आतापर्यंत अनेक वेळा केली असली तरी त्यात सातत्य नाही. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेणारेही अनेक आहेत. आज अतिक्रमण काढले की लगेचच काही दिवसांनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. त्याचबरोबर इतर नियमांचीही अशीच परिस्थिती असल्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

विविध पथके स्थापन करणार


महापालिकेतर्फे तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने नियमित विविध पथके स्थापन करून कार्यवाही करण्यात येत असते. प्लॅस्टिक बंदीच्या संदर्भाने केलेल्या कारवाईत जवळपास सहा लाख २१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतरही कारवाईतून दंडात्मक वसुली केली जाते. अतिक्रमणासंदर्भात तसेच स्वच्छता नसलेल्या रिकाम्या भूखंडावर सध्या कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिली.  


दंडात्मक कारवाईस सुरुवात


महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत वेळोवेळी अशा मोहिमा राबवून कार्यवाही करण्यात येते. रस्ते, मार्गावर घाण करणे, कचरा टाकला तर १५० रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास शंभर रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास शंभर, तर उघड्यावर शौच केल्यास पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येतो. मागील वेळेस या मोहिमेतून एक लाख दोन हजार ३५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. ही कार्यवाही निरंतर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेख यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com