कलावंतांसह तयार व्हावेत तंत्रज्ञ

कलावंतांसह तयार व्हावेत तंत्रज्ञ

सांस्कृतिक, मनोरंजन

सांस्कृतिक क्षेत्रात एकेकाळी मराठवाड्याचा दबदबा होता. व्यावसायिक, दलित रंगभूमी समृद्ध होती. आता मात्र स्थिती बदलली असून, या क्षेत्रात पिछाडी असल्याचे चित्र आहे. लोकसंगीत प्रकार मर्यादित झाले. महाविद्यालयांच्या नाट्यशाखा असल्या तरी दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे. चांगली नाटके येत नाहीत. चित्रपट चित्रीकरणासाठी भरपूर लोकेशन्स असूनही ती दुर्लक्षित आहेत. सांस्कृतिक पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी ठोस धोरणाची व त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे...

व्यावसायिक रंगभूमी, दलित रंगभूमी ही कधीकाळी मराठवाड्याची ओळख होती. त्यात वेगवेगळे प्रयोग व्हायचे. आता कुणीही नवनिर्मिती करीत नसल्यामुळे ही रंगभूमी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. मराठवाड्यातील कलावंतांमध्ये टॅलेंट असले, तरी संधी नाही.

नाट्यशास्त्राची महाविद्यालये आहेत; पण दर्जेदार शिक्षण नाही. तंत्रज्ञान असले तरी ते हातळण्याचे कसब नाही. शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायनामध्ये मोठ्या संधी मिळत नाहीत. संख्या वाढूनही शॉर्ट फिल्म सर्वांपर्यंत पोचविण्याची सक्षम यंत्रणा नाही. चित्रीकरणासाठी भरपूर लोकेशन्स असूनही ती दुर्लक्षित आहेत. लोककला आणि लावणी हे प्रकार केवळ राजकीय कार्यक्रम आणि महोत्सवापुरतेच मर्यादित राहिले आहेत. फिल्म फेस्टिव्हल, नाट्यसंमेलने होतात, एवढीच काय ती जमेची बाजू. 

या भागातील कलावंतांनी सिनेमा, नाटक, शास्त्रीय नृत्य, गायन, लोककला, पोवाडा आदी प्रकार जपले. आपपाल्या परीने ते देश-विदेशांत पोचविण्याचा प्रयत्न केला. सध्या या क्षेत्रात बोटावर मोजण्याइतकेच लोक आहेत. पोषक वातावरण असूनही पुरेशा संधी नसल्याने या भागाला सांस्कृतिक मागासलेपण आले आहे. रेकॉर्डिंगसाठी छोटे-मोठे मिळून शंभरच्या आसपास स्टुडिओ आहेत. चित्रीकरणासाठी तंत्र, साहित्य नाही. यासाठी मुंबई-पुण्याला जावे लागते. हे तंत्र पुरविणारी संस्था स्थापन होण्याची गरज आहे.

सिनेटोग्राफीसह सासंकृतिक क्षेत्राशी संबंधित तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणारे विविध छोटे कोर्स नाट्यशास्त्र महाविद्यायात सुरू होणे गरजेचे आहे. चित्रीकरणासाठी चांगली लोकेशन आहेत. त्यांचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही. शॉर्ट फिल्म बनविणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असली, तरी मार्केटिंग आणि प्रदर्शनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे शॉर्ट फिल्मचा प्रचार आणि प्रसार होत नाही. परिणामी हे क्षेत्र केवळ हौसेच्या पातळीवर आहे. ‘शॉर्ट फिल्म’मध्ये स्पर्धा निर्माण होऊन टॅलेंट समोर आणणे गरजेचे आहे. शास्त्रीय संगीतातही मराठवाड्यातील दिग्गजांनी मोठी परंपरा निर्माण केली. नवी पिढी शास्त्रीय संगीतक्षेत्रात यावी, यासाठीही प्रयत्न व्हावेत.  

नाट्यगृहांची दुरवस्था
मराठवाडड्यात वीस नाट्यगृहे असून, दुरवस्था आहे. औरंगाबाद वगळता अन्यत्र सुसज्ज नाट्यगृह नाही. पुणे-मुंबईच्या तुलनेत महिन्याभरात केवळ ५ ते ७ नाटकांचे प्रयोग होतात. नाट्यरसिक मोठ्या प्रमाणावर असले, तरी प्रयोग वाढविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. औरंगाबादमध्ये नाट्यगृहे बऱ्यापैकी असली तरी सोयी-सुविधांसाठी कलावंतांनाच ओरड करावी लागते. मराठवाड्यातून मुंबई-पुण्याला गेलेल्या कलाकारांनी स्थानिक रंगभूमी सक्षमीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे. 

ग्रामीण रंगभूमीला चालना हवी
मराठवाड्यात ग्रामीण रंगभूमीनेही वेगळी ओळख निर्माण केली. लोककला, मेळा, नाटके, लावणी, तमाशा, एकांकिका आदी प्रकार स्थानिक प्रश्‍न घेऊन सादर होतात. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. प्रचार-प्रसारअभावी या रंगभूमीचा विस्तार होऊ शकला नाही. ग्रामीण रंगभूमीला चालना देण्याची गरज आहे.

चित्रपट महोत्सव
औरंगाबादेत काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे. त्यामुळे दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या महोत्सवाचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे. 

कलावंतांना हवी संधी
दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांमुळे कलावंतांसाठी संधीही वाढल्या आहेत. असे असले तरी मराठवाड्यातील कलाकारांना मोठी धडपड करावी लागते. या भागात टॅलेंट आहे. हवी आहे फक्त संधी. कलावंत, तंत्रज्ञ, संहिता लेखक आदींसह या क्षेत्राला लागणारे विविध घटक  घडविण्यसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न व्हायला हवेत.

दृष्टिक्षेपात...

  • मराठवाड्यात छोटी-मोठी नाट्यगृहे - २०
  • महिनाभरात सरासरी व्यावसायिक नाट्यप्रयोग - ७ 
  • शास्त्रीय संगीत, नृत्यशिक्षण देणाऱ्या संस्था, क्‍लासेस - ५० हून अधिक
  • महाविद्यालयांत नाट्यशस्त्र विभाग - १७
  • चित्रीकरणासाठी अनेक लोकेशन्स

या आहेत अपेक्षा

  • नाटक प्रयोग वाढीसाठी नाट्यगृहांत सुविधा
  • महाविद्यालयांतील नाट्यशस्त्र विभागांना पुरेशा सुविधा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र 
  • विभागात छोटे-छोटे कोर्स सुरू व्हावेत
  • व्यवसायिक, दलित, ग्रामीण रंगभूमीला चालना मिळावी.
  • परभणी, नांदेड येथील एकांकिका, नाट्यमहोत्सव पुन्हा सुरू व्हावेत
  • महाविद्यालयांत लोककला विभाग सुरू व्हावा.
  • नटवर्य लोटू पाटील यांच्या नावाने स्मारक व्हावे
  • सोयगावात पूर्वीप्रमाणे नाट्यमहोत्सव व्हावा
  • कलावंत, तंत्रज्ञ घडविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज

तज्ज्ञ म्हणतात

निजामाच्या काळात शास्त्रीय संगीत, नृत्याला तेवढासा वाव नव्हता. तरीही नांदेडचे गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर, बीड, परभणी, औरंगाबादची काही मंडळी छोट्या-छोट्या संगीत मैफली घेत. त्यांच्यापासून हळूहळू मराठवाड्यात शास्त्रीय संगीताचा रसिक तयार झाला. त्यानंतर संगीत महोत्सवामुळे व्याप्ती वाढली. आमच्या काळी शास्त्रीय संगीताचा आभ्यस करणाऱ्यांना वेड्यात काढायचे. आता मात्र पालक जागरुक झाले आहेत. संगीताचे शिक्षण देणारे असंख्य क्‍लासेसे सुरू झाले असले तरी दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षण देणारे रियाज करीत नाहीत. पूर्वीसारखे अस्सल कलावंत व रसिक आता होताना दिसत नाहीत. शास्त्रीय संगीतासाठी पोषक वातावरण असले तरी चांगले शिक्षण, शिक्षक मिळायला हवेत. 
- पंडित नाथराव नेरळकर, ज्येष्ठ शास्त्रीय गायक

शास्त्रीय संगीताचा प्रसार होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शास्त्रीय संगीतातील कलावंतांना लोकांसह माध्यमांनी सातत्याने दाद द्यायला हवी, प्रोत्साहन द्यायला हवे. मुंबई-पुण्याप्रमाणेच संधी मिळत गेल्या तर स्थानिक कलाकार मोठे होतील. शिक्षकांनीही केवळ पुस्तकी मार्गदर्शन न करता व्यावहारिक ज्ञान व कला सादरीकरणाची कौशल्ये विद्यार्थ्यांना शिकवायला हवीत.
- आशालता करलगीकर, प्रसिद्ध गायिका

औरंगाबाद शहराचे सांस्कृतिक आरोग्य सुधारायचे असेल तर महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने किमान महिन्यातून एकदा सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना भेटले पाहिजे. त्यांचे प्रश्‍न समजून घेतले पाहिजेत. रंगमंदिरांची स्थिती सुधारावी. वेगळा ठराव करून हौशी नाटककारांना ते अत्यल्प दरात उपलब्ध करून द्यावे. मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने एकांकिकांचा प्रसार करण्यासाठी योजना आखावी. कलाक्षेत्रात करिअरसाठी मुंबई, पुणे गाठणाऱ्या मुलांना तिथे पाठ टेकण्यासाठी जागा असावी. आपापल्या जिल्ह्याचे एखादे भवन तिथे उभारण्याचा विचार व्हावा.
- प्रा. दिलीप घारे, ज्येष्ठ रंगकर्मी

नाट्यचळवळ मंदावलेली आहे. पूर्वीसारखे कसदार लेखन आता दिसत नसल्याचे चित्र दिसते. लेखकांना लिहिते करण्यासाठी जिल्हा, विभागस्तरावर शिबिरे, कार्यशाळा घ्याव्यात. बाहेरचे जाणकार, तंत्रज्ञ, कलाकारांना पाचारण करून स्थानिक मुलांना मार्गदर्शन करावे. या क्षेत्रात भरीव असे कार्य करायला वाव आहे.
- रुस्तुम अचलखांब, प्रसिद्ध नाट्यलेखक

मराठवाड्यात कलाकारांची कमतरता नाही. टॅलेंटही खूप आहे. पण कलाकाराला आपल्या कलेचे चीज करण्यासाठी प्रत्येकवेळी मुंबई, पुणे गाठावे लागते. तिथे उपलब्ध असलेल्या सर्व सोयी-सुविधा मराठवाड्यात मिळाल्या पाहिजेत. वेरूळ-अजिंठा महोत्सवाप्रमाणेच शहरात मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जावेत. 
- शरद दांडगे, प्रसिद्ध तबलावादक

स्थानिक कलावंताला स्टेज मिळत नाही. चांगल्या कार्यक्रमांना पुरेसे महत्त्व द्यायला हवे. वेरूळ महोत्सवासारख्या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांची हेळसांड केली जाते, असे प्रकार टाळायला हवेत. बाहेरच्या कलाकारांवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा जिल्हा पातळीवरील कलाकारांना किमान सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. 
- शाहीर सुखदेव खोमणे

मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरात सांस्कृतिक कार्यक्रम अधिक होतात. स्थानिक कलाकारांनी अशा ठिकाणी जाऊन किंवा वेगवेगळ्या राज्यांत गटागटाने जाऊन तिथल्या कलाकारांशी ओळखी वाढवाव्यात. त्यांच्यासोबत शिबिरे घ्यावीत. सामूहिक प्रदर्शने भरवावीत. बाहेरच्या नव्या लोकांशी संपर्क वाढविल्यास स्थानिक कलावंतांचा अनुभव समृद्ध होईल, वाटचाल सुकर होईल.
- विजय कुलकर्णी, प्रसिद्ध चित्रकार

मराठवाड्यात १९९६ च्या काळात दोन ते तीन संगीत, नृत्यप्रशिक्षक होते. आता ही संख्या अनेक पटींनी वाढली; मात्र दर्जा वाढला नाही. आताचे संगीत, नृत्यशिक्षण मर्यादित स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्याचा विस्तार होत नाही. पूर्वीची गुरू-शिष्य परंपरेचा विसर पडला आहे. त्यामुळे शिक्षण-प्रशिक्षण देणारे-घेणारे पुढे शिकू इच्छित नाहीत. विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना विदेशात छोट्या-मोठ्या महोत्सवात सादरीकरण करून परत आणायचे, यात अस्सल कलावंत घडत नाहीत. कला हे सेवाभावाचे क्षेत्र आहे. सेवाभाव प्रत्येक कलाकार, शिक्षण देणाऱ्यात असायला हवा. सध्या गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्या केवळ एक ते दोन संस्था आहेत. त्या वाढाव्यात.   
- पार्वती दत्ता, शास्त्रीय नृत्यांगना, अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com