मानवतावादी विचार जगण्यातून झिरपावेत - ऍड. उज्ज्वल निकम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

लातूर - साहित्यकृतीमधूनच राष्ट्राचे चरित्र निर्माण होते. निर्माण करण्याची, नवे घडविण्याची शक्ती साहित्यिकांत असते. साहित्यात प्रागतिक आणि मानवतावादी विचार असतात; पण ते आचरणात आल्याचे फारसे दिसत नाही. मानवतावादी विचार प्रत्येकाच्या जगण्यात झिरपले पाहिजेत, तरच नवा समाज घडविता येईल, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

लातूर - साहित्यकृतीमधूनच राष्ट्राचे चरित्र निर्माण होते. निर्माण करण्याची, नवे घडविण्याची शक्ती साहित्यिकांत असते. साहित्यात प्रागतिक आणि मानवतावादी विचार असतात; पण ते आचरणात आल्याचे फारसे दिसत नाही. मानवतावादी विचार प्रत्येकाच्या जगण्यात झिरपले पाहिजेत, तरच नवा समाज घडविता येईल, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

दयानंद सभागृहातील प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत 34 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन ऍड. निकम यांच्या हस्ते शनिवारी (ता. 14) झाले. त्या वेळी ते बोलत होते. अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते डॉ. गंगाधर पानतावणे, संमेलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव गादेकर, माजी संमेलनाध्यक्ष रविचंद्र हडसनकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे रामचंद्र तिरुके, प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रा. युवराज धसवाडीकर, राजेंद्र लातूरकर, प्रा. जयप्रकाश हुमने, संजय घाडगे, डॉ. सविता किर्ते, डी. एम. नरसिंगे, यू. डी. गायकवाड, रामराजे आत्राम, डॉ. विजय अजनीकर, दत्तात्रय बनसोडे आदी उपस्थित होते.

ऍड. निकम म्हणाले, की समाजातील समता व न्यायाचा अभाव दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर काम केले. समता, बंधुता, न्याय यासाठी न्यायालये स्थापन झाली आहेत. त्या न्यायालयात मी काम करतो. साहित्यिक नसलो तरी कायद्याने लढणारा डॉ. आंबेडकरांचा शिलेदार आहे.

ऍड. निकम म्हणाले, तळागळातील लोकांना हालअपेष्टा सहन करीत जगावे लागते. या त्यांच्या जगण्याच्या संघर्षातून निर्माण झालेले कसदार साहित्य म्हणजे दलित साहित्य होय. ज्यांना अन्याय सहन करावा लागतो, ज्यांना वेदना होतात, त्यांचे प्रतिबिंब ज्या साहित्यातून उमटते तोच खरा आंबेडकरांचा पाईक म्हणता येईल. प्रभावी साहित्यिक समाजाला दिशा देतात. साहित्यात मानवतावाद आहे. मानवतावादी विचारही आहेत; पण ते प्रत्येकाच्या जीवनात झिरपले पाहिजेत. त्यासाठी समाजात सुधारणा घडवून आणणारे साहित्य निर्माण व्हावे. जातीला मूठमाती देऊन पुरोगामी साहित्यिकांना एकत्र आणणारे अस्मितादर्श हे विचारपीठ आहे. आंबेडकरी चळवळीचे ते ऊर्जाकेंद्र आहे.

संविधानाचे मूल्य महत्त्वाचे - डॉ. वाघमारे
डॉ. वाघमारे म्हणाले, "अस्मितदर्श'च्या स्थापनेपासूचा मी साक्षीदार आहे. पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यात डॉ. पानतावणे व अस्मितादर्शचे मोठे योगदान आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरणेमुळे अस्मितादर्श चळवळ मोठी झाली. त्याने दलित साहित्यात मोठा इतिहास घडला. दलित साहित्याने क्रांतियुग निर्माण केले. क्रांतीची भाषा दलित साहित्यातच शोभून दिसते. अनेक लेखकांनी सकस लेखन केले. या संमेलनात केवळ साहित्याची चर्चा होत नाही, तर सांस्कृतिक चिरफाड होते. कोणताही वैचारिक वाद स्वीकारण्यापेक्षा घटनावाद स्वीकाराला हवा. हेच संविधानाचे मूल्य सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकते.

डॉ. कृष्णा किरवले, डॉ. संध्या रंगारी यांचा अस्मितादर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री. दगडे यांचेही भाषण झाले. प्राचार्य डॉ. माधव गादेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुधीर अनवले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोक नारनवरे यांनी आभार मानले. मराठवाड्यातून आलेले साहित्यिक, लेखक, कवी व साहित्यप्रेमींनी सभागृह गच्च भरले होते.

Web Title: ad. ujjawal nikam talking