गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच मीटरने भूजल पातळीत वाढ 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच मीटरने भूजल पातळीत वाढ 

बीड - जिल्ह्यात गतवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यापूर्वीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्मादेखील पाऊस झाला नसल्याने जानेवारी 2016 अखेर जिल्ह्यातील भूजल तब्बल 10.47 मीटरवर खोल गेले होते; मात्र त्यानंतर पावसाळ्यात शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात दोनदा अतिवृष्टी झाल्यामुळे गतवर्षी तब्बल 125 टक्के इतका पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी जानेवारीअखेर भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणनेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील भूजल पातळीत जवळपास 5 मीटरने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. 

जिल्ह्यात सलग चार वर्षांच्या दुष्काळानंतर गतवर्षीच्या पावसाळ्यात दमदार पावसाने हजेरी लावली. वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त म्हणजेच तब्बल 125 टक्के पावसाची नोंद 6 नोव्हेंबर 2016 रोजी घेण्यात आली. त्यापूर्वी 2015 मध्ये वार्षिक सरासरीच्या निम्मादेखील पाऊस जिल्ह्यात झाला नव्हता. त्यामुळे जानेवारी 2016 अखेर जिल्ह्यातील भूजल पातळी 10.47 मीटरवर गेली होती; परंतु त्यानंतर दमदार पाऊस झाल्यामुळे यंदा जानेवारीअखेर भूजल पातळी 5.58 मीटरवर स्थिरावली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारीअखेर भूजल पातळीत तब्बल 4.89 मीटरची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 236 विहिरींचे निरीक्षण करून भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेने जाहीर केलेल्या अहवालावरून ही बाब समोर आली आहे. 

एरवी दुष्काळग्रस्त व अवर्षणप्रवण समजल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्‍यात सर्वांत जास्त सुमारे 8.46 मीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. गेवराई तालुक्‍यात भूजल पातळीत सर्वात कमी 3.7 मीटरची वाढ झाली आहे. जिल्हाभरात सरासरी 4.89 मीटरची वाढ नोंदविण्यात आली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच तालुक्‍यांमधील भूजल पातळीत वाढ झाली आहे, हे उल्लेखनीय आहे. गतवर्षी जानेवारीअखेर त्यापूर्वीच्या पाच वर्षांच्या भूजल पातळीच्या सरासरीच्या तुलनेत 2.82 मीटरची घट नोंदविण्यात आली होती. ही घट भरून निघाली असून याउलट 5 मीटरने भूजल पातळी वाढली आहे. वाढलेल्या पाणीपातळीमध्ये त्यापूर्वीची घट गृहीत धरल्यास एकूण तब्बल 7.71 मीटरने पाणीपातळी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी संरक्षित पाणी देण्याची सोय झाल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. मेश्राम यांनी सांगितले. 

तालुकानिहाय भूजल पातळी (आकडे मीटरमध्ये) 

तालुका- गतवर्षी जानेवारीअखेरची भूजल पातळी- यंदाची जानेवारीअखेरची भूजल पातळी- भूजल पातळीतील वाढ- 
अंबाजोगाई-10.44-5. 70-4.74- 
आष्टी-13.30-4.84-8.46- 
बीड-11.44-5.62-5.82- 
धारूर-8.07-3.93-4.14- 
गेवराई-11.53-7.83-3.7- 
केज-11.10-5.53-5.57- 
माजलगाव-9.82-6.45-3.37- 
परळी-9.97-4.67-5.3- 
पाटोदा-9.40-4.48-4.92- 
शिरूर-11.15-7.80-3.35- 
वडवणी-8.90-4.50-4.4- 
एकूण-10.47-5.58-4.89- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com