प्रशासनाची दिरंगाई, युवकाने केली नैराश्‍यातून आत्महत्या

Aurangabad Gramin News
Aurangabad Gramin News

करमाड  (जि.औरंगाबाद) : न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माझा फेरफार नोंदवण्यात यावा या मागणीसाठी पाच वर्षांपासुन हेलपाटे मारणाऱ्या बत्तीस वर्षीय युवकाने शेवटी प्रशासनाच्या दिरंगाईस कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मलकापूर (ता.औरंगाबाद) शिवारातील शेतात सोमवारी (ता.18) रात्री घडली. संतोष रामचंद्र जाधव (वय 32, रा. पिसादेवी रोड, हर्सूल, ता.औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

त्याने सोमवारी रात्री मलकापुर येथील शेतातील एका लिंबाच्या झाडाला फास घेत आपले जीवन संपवले. मृताचा भाऊ दिपक याने मंगळवारी (ता.19) दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलिसांनी मलकापुरच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. संतोष जाधव यांचे वडील रामचंद्र जाधव यांनी 25 वर्षांपूर्वी मलकापूर (ता.औरंगाबाद) शिवारातील गट क्रमांक 43 मध्ये मनोहर मोरे (रा. पिंप्रीराजा) यांच्याकडून दोन एकर जमीन संतोषच्या आईच्या नावाने खरेदी केली.

श्री.मोरे हे नात्याने संतोषच्या आईचे मामा. श्री. मोरे यांनी एकीकडे भाचीला जमीन विक्री करून खरेदी खत सुध्दा करून दिले. तथापि, दुसरीकडे लागलीच या जमिनीची आपल्या कुटुंबातील सदस्यात खातेफोडही करून दिली व यातील सदरची दोन एकर जमीन आपल्या पत्नीच्या खातेफोड आधारे करून दिली. याबाबत व खरेदीच्या जमीन फेरफार प्रक्रियेबाबत श्री. जाधव हे अनभिज्ञ होते. उलट जवळचे नातेवाईक असल्याने मोठ्या विश्वासाने सदरची जमीन श्री.जाधव यांनी श्री.मोरे यांच्या पुतण्याकडेच कसायला दिली होती. यावेळी श्री.जाधव यांची दोन्ही मुले लहान होती.

हेही वाचा- उस्मानाबादसह चार तालुके गूढ आवाजाने हादरले


दरम्यान, संतोष मोठा झाल्यानंतर त्याने सर्वप्रथम 2010 मध्ये मलकापूर येथील गट क्रमांक 43 च्या शेतीचा सातबारा काढला असता त्याला धक्काच बसला. कारण या गटातील कुठलेच क्षेत्र त्याला आपल्या आईच्या नावाने आढळून आले नाही. त्यामुळे त्याने याबाबत मनोहर मोरे यांना वारंवार विचारणा केल्यानंतरही त्यास टाळाटाळीची उत्तरे मिळू लागली. त्यामुळे त्याने खरेदीखतानंतर श्री.मोरे यांनी खातेफोड करून सदरील जमीन पत्नीच्या नावे केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 2014 मध्ये न्यायालयीन लढाई सुरू झाली. यात संतोषच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे त्याने पोलिसांची मदत घेत शेतही ताब्यात घेतले.


त्यानंतर संतोष जाधव याने न्यायालयाच्या आदेशाची प्रत तलाठी कार्यालयात जमा करून फेरफार करण्यासाठीचा अर्ज सादर केला. तथापि, वारंवार चकरा मारूनही तलाठी व त्यानंतर मंडळ अधिकारी फेरफार करण्यास टाळाटाळ करून पैशाच्या मागणीसह वेगवेगळी कारणे देत वेळ पुढे ढकलत होते. त्यामुळे संतोष कमालीचा त्रासला होता. यातच सोमवारी (ता.18) संतोष याने तो जमिनीकडे व त्यानंतर तलाठी व मंडळ अधिकाऱ्याची भेट घेऊन येतो असे सांगून हर्सूल येथील घरून निघाला.

या दरम्यान त्याने दिवसभरात आपल्या भावाच्या मोबाईलवर व्हॉट्‌स ऍपद्वारे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यातील आतापर्यंतची फोनवरील सर्व संभाषणे पाठवली व आता सगळे संपले असल्याचा निरोप दिला. त्यामुळे संतोषचे कुटुंबीय घाबरून गेले व त्यांनी त्याची शोधाशोध केली असता रात्री साडेनऊच्या सुमारास शेतातील झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तात्काळ त्यास औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्‍टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मंगळवारी (ता.19) दुपारी शवविच्छेदनानंतर संतोष जाधव यांच्यावर सायंकाळी पाच वाजता हर्सूल येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com