वन्यजीवांच्या अस्तित्वाचा विसर

नवनाथ येवले
गुरुवार, 11 मे 2017

मागील तीन वर्षांपासून आम्ही वाईल्ड लाईफ संस्था व वनविभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने ग्रुपनुसार बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना केली; मात्र यावर्षी वन विभागाकडून आम्हाला वन्यजीवगणनेबाबत कसलीच कल्पना देण्यात आली नाही.
-प्रसाद शिंदे, निसर्गप्रेमी

नांदेड - जिल्ह्यातील वनविभागाच्या परिक्षेत्रातील प्राणी - पक्ष्यांचा वावर, अस्तित्वाच्या मूल्यांकनासाठी वनविभागातर्फे निसर्गप्रेमी, स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना अनिवार्य आहे; मात्र यावर्षी प्रशासनाला बुद्ध पौर्णिमेच्या वन्यजीव गणनेचा विसर पडल्याचा प्रकार समोर आला आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनासह वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन महत्त्वाचे आहे. जिल्ह्याच्या एकूण 10528 क्षेत्रफळापैकी 1299 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्यजीवांच्या दुर्मिळ प्रजाती कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग चक्रानुसार मानवी जीवनात वन्यजीवांचे अस्तित्व कायम असल्याने शासनाचे कठोर कायदे अंमलात आहेत. शिकारी, उपद्रवी प्राण्यांसह पक्ष्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी वनकायद्यांतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे. जैव विविधतेनुसार वन्यजीवांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. परिक्षेत्रात वन्यजीवांच्या अस्तित्वाच्या मूल्यांकनानुसार दुर्मिळ वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण उपाययोजना राबविण्यात याव्यात या उद्देशाने कृत्रिम पाणवठ्यावर प्रतिवर्षी निसर्गप्रेमींच्या पुढाकराने वनविभागामार्फत बुद्धपौर्णिमेला वन्यजीव गणना करण्यात येते. जिल्ह्यात साधारणपणे बिबट्या, रानमांजर, तरस, रानडुक्कर, चिंकारा, काळवीट, लांडगा, कोल्हा, उदमांजर, नीलगाय, अजगर, नाग, सांबर, चितळ, माकडं, वानरं, मुंगूस आदी प्राण्यांसह विविध प्रकारांचे पक्षी, वटवाघूळ, घुबड, रानकोंबडी, मोर आदी वन्यजीवांचा वावर आहे. दरवर्षी वन्यजीव गणनेच्या माध्यमातून या वन्यजीवांचे निरीक्षण आणि संख्या नोंदवण्यात येते. वन्यजीव गनना कालावधीत जंगलात पाणीदेखील कमी असते. त्यामुळे नेमक्‍या ठिकाणच्या कृत्रिम पाणवठ्यांवर येऊन प्राणी, पक्षी पाणी पितात. तहान भागविण्यासाठी येणाऱ्या वन्यजीवांचे निरीक्षण करून त्यांची संख्या नोंदविली जाते. याव्यतिरिक्त वन्यजीवांचे ओरखडे, विष्ठा, त्यांची पाऊले यांसारख्या खुणांवरून ही गणना केली जाते. वन्यजीव गणना करताना शांतता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, एकमेकांशी बोलू नये, सफेद रंगाचे कपडे परिधान करू नये, मोबाईलचा वापर टाळावा, कॅमेराचा वापर न करणे आदी सूचनांचे पालन करणे बंधनकारक असते; मात्र वन्यजीव संरक्षण संवर्धन कायद्याचे रक्षण करणाऱ्या वनविभागालाच यंदा वन्यजीव गणनेचा विसर पडल्याने निसर्गप्रेमीतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बुद्धपौर्णिमेचा मुहूर्त
बुद्धपौर्णिमेची लख्ख चांदणी रात्र दिवसाप्रमाणे असते. शिवाय कडक उन्हाळ्यात नैसर्गिक पाणवठे शक्‍यतो कोरडे पडलेले असतात त्यामुळे तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांचे सहज मूल्यांकन व्हावे या उद्देशाने बुद्धपौर्णिमेलाच वन्यजीव गणनेसाठी महत्त्व आहे.

मागील तीन वर्षांपासून आम्ही वाईल्ड लाईफ संस्था व वनविभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने ग्रुपनुसार बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना केली; मात्र यावर्षी वन विभागाकडून आम्हाला वन्यजीवगणनेबाबत कसलीच कल्पना देण्यात आली नाही.
-प्रसाद शिंदे, निसर्गप्रेमी

Web Title: administrative negligence in nanded