घटना परभणीची, नोंद औरंगाबादला अन् तपास नांदेडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे मिळून जेमतेम दोन डझन पोलिसांवर सर्व स्थानके आणि रूळाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. गत 50 वर्षांत पोलिसांची संख्याही वाढविता आली नाही. हे कच्चे दूवे पाहून परभणी जिल्ह्यास चोरट्यांनी टार्गेट केले आहे

परभणी - घटना परभणीची नोंद औरंगाबादला अन् तपास नांदेडकडे, अशी अवस्था गेल्या रविवारी पेडगाव ते देऊळगाव दरम्यान झालेल्या रेल्वेलूट प्रकरणाची आहे. गतवर्षी देखील अशा डझनावर घटना होवून अद्याप तपासाचा पत्ता नसल्याने याही घटनेचे त्यापलिकडे काहिही होणार नाही. आर्थात हा प्रकार म्हणजे उंटावरुन शेळ्या राखण्यासारखा आहे.

परभणी जिल्ह्यातील सहा रेल्वेस्थानके काळ्या यादीत समाविष्ठ आहेत. गंगाखेड, पेडगाव, पोखर्णी, देऊळगाव, मानवत रोड, वडगाव निळा आणि सेलूचा त्यात समावेश आहे. गतवर्षी औरंगाबाद- रेनीगुंटा, दौंड पॅसेंजर, अजिंठा एक्सप्रेस, मुंबईकडून-काझीपेठ एलटीटी एक्सप्रेस या एक्सप्रेसह इतर रेल्वे थांवून लुटमार करण्यात आली. दरम्यान, त्याचे गुन्हेही दाखल झाले. ते नांदेड, नागपूर आणि औरंगाबाद रेल्वे पोलिसांत नोंदविण्यात आले. कारण परभणीत रेल्वे पोलिस ठाणे नाही. अद्यापही पोलिस चौकीवरच सुरक्षेचा भार असून तो दक्षिण मध्यरेल्वेच्या विभाजनानंतर आजतागायत कायम आहे. जवळपास 1663 पासून आतापर्यंत चौकीचे ठाण्यात रूपांतर झाले नाही. तूर्तास रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे मिळून जेमतेम दोन डझन पोलिसांवर सर्व स्थानके आणि रूळाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. गत 50 वर्षांत पोलिसांची संख्याही वाढविता आली नाही. हे कच्चे दूवे पाहून परभणी जिल्ह्यास चोरट्यांनी टार्गेट केले आहे.

गतवर्षी मे महिन्यात अनेकवेळा रेल्वे थांबून प्रवाशांना लुटण्यात आले. अद्याप त्याचा तपास लागलेला नाही. यावेळी देखील त्यापेक्षा निराळे काही होणार नाही. आता पेडगाव (ता.परभणी) व देऊळगाव अवचार (ता.सेलू) हे दोन्हीस्थानके परभणी जिल्ह्यातील आहेत. ते नांदेड रेल्वे ठाण्यातंर्गत येतात. या दोन्ही स्थानकादरम्यान रविवारी (ता.14) सिग्नलमध्ये बिघाड करून रेल्वे थांबवून प्रवाशांना लुटण्यात आले. त्याची नोंद नांदेडला होण्याऐवजी औरंगाबादला करण्यात आली. तो गुन्हा नांदेडकडे वर्ग करण्यात येणार येईल. मंगळवारपर्यंत (ता.16) त्याला मुहूर्त लागलेला नव्हता. मग परभणी चौकीला माहिती होण्याचा विषयच नाही. काहीही झाले तरी परभणीच्या स्थानिक पोलिसांनाच अधिक तपास करावा लागेल. जरी तपास अधिकारी नांडेचा असला तरी स्थानिक पोलिसांविना तपासाची नय्या पार होणार नाही. मागील तपासाचा पूर्वेतिहास पाहता कालांतराने या घटनेचा तपास मध्यंतरीच सोडून दिला जाईल. कारण तोपर्यंत एखादी नवीन घटना घडते. हे गेली कित्येक वर्षांपासून होत आले असून ते परभणीकरांचे दुर्दैव आहे.

पेडगाव दुर्घटनेचे केंद्र
2016 या वर्षीच्या एकट्या मे महिन्यात तब्बल तीनवेळा एक्सप्रेस रेल्वेवर पेडगाव स्थानकात दगडफेक करून लुटमार करण्यात आली. प्रत्येकवेळी सिग्नल तोडने आणि बंद पाडणे, हे चोरट्यांच्या डाव्या हाताचा खेळ होवून बसला आहे. हा पूर्वानुभव असतानाही येथे पोलिस नेमले जात नाहीत. त्यातून चोरांना रान मोकळे झाले आहे. म्हणून पुढेही घटनेची पुनरावृती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. येथून नांदेड पोलिसांकडे वर्ग होईल. त्यानंतर परभणी चौकीला माहिती गुन्ह्याची माहिती मिळेल. तूर्तास आमच्याकडे गुन्हाबाबत आणि तपासाबाबत कल्पना नाही.
-अमित उपाध्याय, सहाय्यक पोलिस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल, परभणी.

Web Title: Administrative negligence by Railway administration