डॉग होस्टेलचे ऍडमिशन दिवाळीमुळे हाऊसफुल्ल! 

मधुकर कांबळे 
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या लागल्या, दिवाळी साजरी करण्यासाठी कुणी स्वत:च्या गावी, तर कोणी नातेवाइकांच्या गावी गेले, तर कोणी कुठेतरी पर्यटनस्थळी जाउन दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी निघाले. मात्र, घरातीलच सदस्यांप्रमाणे सांभाळलेल्या डॉगीची (पाळीव कुत्रा) व्यवस्था लावूनच जावे लागेल असा विचार करीत अनेकांनी त्यांच्या कुत्र्याला होस्टेलमध्ये पाठवून दिले. यामुळे सातारा परिसरातील डॉग होस्टेलमधील ऍडमिशन फुल्ल झाले आहेत. 

औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या लागल्या, दिवाळी साजरी करण्यासाठी कुणी स्वत:च्या गावी, तर कोणी नातेवाइकांच्या गावी गेले, तर कोणी कुठेतरी पर्यटनस्थळी जाउन दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी निघाले. मात्र, घरातीलच सदस्यांप्रमाणे सांभाळलेल्या डॉगीची (पाळीव कुत्रा) व्यवस्था लावूनच जावे लागेल असा विचार करीत अनेकांनी त्यांच्या कुत्र्याला होस्टेलमध्ये पाठवून दिले. यामुळे सातारा परिसरातील डॉग होस्टेलमधील ऍडमिशन फुल्ल झाले आहेत. 

घराचा प्रामाणिक रखवालदार म्हणून कुत्र्याकडे पाहिले जाते. आता शहरी भागात घरातल्या एका सदस्याप्रमाणेच त्यांना स्थान आहे. मुलांनी हौसेने कुत्रे आणलेले असते. नंतर मुले मोठी झाल्यानंतर नोकरी, शिक्षणासाठी बाहेरगावी जातात त्यावेळी त्या घरातील वयस्कर सदस्यांना कुत्र्यांना सांभाळणे कठीण होते. बाहेरगावी जायचे असेल तर जाता येत नाही. कधी घरात कोणी आजारी असेल तर कुत्र्यांचे भुंकणे त्यांना त्रासदायक वाटते. नातेवाइकांकडे जाण्यापूर्वी, बाहेरगावी किंवा कार्यालयीन दौऱ्यावर जाताना, दिवाळी, लग्नसमारंभ अशा प्रसंगी घरातील पाळीव कुत्र्याला कुठे ठेवावे, असा प्रश्‍न कुत्र्यांच्या मालकापुढे उभा राहतो. ही गरज ओळखून अभिमन्यू पेट क्‍लिनिकचे डॉ. अनिल भादेकर यांनी सातारा परिसरात 2000 मध्ये एकाच वेळी 20 कुत्र्यांना राहता येईल अशी व्यवस्था असलेले डॉग होस्टेल बांधले आहे. या होस्टेलमध्ये यंदाच्या दिवाळीतही ऍडमिशन फुल्ल झाले आहेत. 

या होस्टेलविषयी डॉ. अनिल भादेकर यांनी सांगितले, की 1985 पासून मी इथे कुत्र्यांवर उपचार करीत आहे. इथे प्रॅक्‍टिस करताना एक बाब लक्षात आली, की चार-दोन दिवसांसाठी किंवा महिना-पंधरा दिवसांसाठी कुत्र्यांच्या मालकांना बाहेरगावी जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळी ते त्यांचा कुत्रा घरी ठेवून जात. शेजाऱ्यांना किंवा वॉचमनला सांगून त्याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना देऊन गरज पडल्यास वॉचमनला काही पैसे देऊन जात. मालक जेव्हा परत यायचे तेव्हा त्या कुत्र्याची योग्य काळजी घेतली न गेल्याने उपचारासाठी घेउन यायचे. हे निदर्शनास आल्यानंतर डॉग होस्टेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज अनेकजण त्यांच्या कुत्र्यांना डॉग होस्टेलमध्ये ऍडमिशन देउन निर्धास्तपणे जातात. आतापर्यंत या होस्टेलमध्ये 4 हजार 200 कुत्री राहून गेली आहेत. यावर्षीही दिवाळीत ऍडमिशन फुल्ल झाले आहेत. 

होस्टेलमधील कुत्र्यांना 
बाटलीबंद पाणी 

होस्टेलमध्ये ऍडमिनश देण्यासंदर्भात डॉ. भादेकर म्हणाले, की कुत्र्यांना प्रामुख्याने गोचिडांचा त्रास असतो. त्यांना ऍडमिशन देण्यापूर्वी गोचीड, पिसवा, ताप आहे का, याची तपासणी करून त्यावर उपचार केले जातात मगच ऍडमिशन दिले जाते. मालकांच्या सूचनेनुसार त्यांना रेडिमेड फुड दिले जाते. त्यांना पिण्यासाठी बाटल्यांमधील शुद्ध पाणी दिले जाते. प्रत्येक कुत्र्यासाठी स्वतंत्र पिंजरे असल्याने त्यांची भांडणे होत नाहीत. दिवसातून चार वेळा त्यांना बाहेर फिरवून आणतो. एका वेळी एकालाच बाहेर काढले जाते. त्यांचे नैसर्गिक विधी अटोपले की त्याला पिंजऱ्यात बंद करून दुसरा कुत्रा बाहेर काढला जातो. यामुळे त्यांच्यात भांडणे, मारामारीचा प्रसंगच येत नाही. फॅन, कुलर्स, कंपाउंड वॉल असल्याने मोकाट कुत्रे तिथे येण्याचा प्रश्‍न नाही. एका पॅगीचा तर वर्षातून किमान तीन-चार वेळा तरी होस्टेलमध्ये मुक्‍काम असतो. कारण तिचे मालक कधी अहमदाबादला मुलीकडे, तर कधी टूरवर जात असतात. जेव्हा केव्हा ते बाहेरगावी जातात तेव्हा पॅगीचे होस्टेलमध्ये ऍडमिशन करून जातात. तिलाही आता होस्टेलची सवय झाली आहे. यंदाची दिवाळीही तिची होस्टेलमध्येच होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission to the Dog Hostel Housefull due to Diwali

टॅग्स
टॉपिकस