प्रवेशाचे 'सार' अर्ध्यावर बंद

Admission
Admission

सोमवारपासून नव्याने प्रवेशप्रक्रिया राबविणार
लातूर - वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी सरकारने या वर्षी "सेतू असिस्टंट ऍडमिशन रजिस्टर" (सार) ही प्रणाली सुरू केली होती. सुरवातीपासूनच उडालेल्या गोंधळामुळे अखेर ही प्रणाली बंद करण्याची नामुष्की राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षावर आली. तसा आदेशही शुक्रवारी काढण्यात आला आहे.

सोमवारपासून (ता.24) नव्याने प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार असली, तरी गेल्या चौदा-पंधरा दिवसांत "सार'मध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेल्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांची कसरत वाया गेली. आता त्यांना पुन्हा नव्याने ऑनलाइन नोंदणी अर्ज करावा लागेल.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी पहिल्यांदाच "सार' प्रणालीचा अवलंब करण्यात आला होता. पहिल्या दिवसापासून या प्रणालीत गोंधळ उडत होता. अडचणी, संभ्रमाबद्दल पालक, विद्यार्थ्याच्या तक्रारी वाढत्याच होत्या. या प्रणालीतून सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेला अखेर गुरुवारी (ता. 20) रात्री स्थगिती देण्यात आली होती. आता तर "सार' प्रणालीच बंद करण्यात आली आहे.

उशिरा सुचलेले शहाणपण
"सार'द्वारं गेल्या पंधरा दिवसांपासून प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. शुक्रवार (ता. 21) हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. रोजचा गोंधळ, वाढत्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर "सीईटी' कक्षाने तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. प्रवेशप्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याचे या समितीला काल कळाले.

प्रवेशशुल्क मिळणार का?
दोन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी करताना प्रत्येकी 42 रुपये शुल्क भरले आहे. त्याची एकत्रित रक्कम 84 लाखांच्या घरात जाते. ती परत कशी मिळणार, हा प्रश्नच आहे. विद्यार्थ्यांना नव्याने शुल्क भरावेच लागणार आहे. "सीईटी' कक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेच्या स्थगितीसंदर्भातील जाहीर सूचनेत अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा उल्लेख आहे. आता हे हितरक्षण कसे केले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

काही तांत्रिक अडचणी आल्याचे लक्षात घेऊन "सार' प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता नव्याने प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असून, 24 ते 30 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. 25 जूनपासून कागदपत्रांची पडताळणी होईल. सरकारकडून अद्याप वैद्यकीय अभ्यासक्रमाची नियमावली आलेली नाही. त्यामुळे सध्या अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र अशा अभ्यासक्रमांसाठी ही प्रक्रिया असेल. या पूर्वी शुल्क भरलेल्यांना ते परत करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. माणिक गुरसळ, आयुक्त तथा सक्षम अधिकारी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com