पुरातत्त्व विभागाला मिळाला वीस वर्षांनी पूर्णवेळ संचालक

संकेत कुलकर्णी
गुरुवार, 13 एप्रिल 2017

औरंगाबाद - वीस वर्षांनंतर राज्य पुरातत्त्व विभागाला पूर्णवेळ संचालक मिळाला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे ऐजॉल मंडळाचे उपअधीक्षक डॉ. तेजस गर्गे यांनी बुधवारी मुंबई येथे पदभार स्वीकारला. ते पुरातत्त्वीय पात्रता असलेले आजवरचे दुसरे संचालक आहेत.

महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालकपद गेली 20 वर्षे रिक्त होते. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे विद्यमान कुलपती डॉ. अ. प्र. जामखेडकर 1997 मध्ये संचालक म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर मंत्रालयातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे हा प्रभार फिरत राहिला. संचालकपदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी परीक्षा, मुलाखती आणि त्याचे निकाल विविध न्यायालयीन कज्जे-खटले आणि दफ्तरदिरंगाईमुळे लांबत गेले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या परीक्षेनंतर काही दिवसांपूर्वी आयोगाने या परीक्षेत पात्र ठरल्यामुळे डॉ. तेजस गर्गे यांच्या नावाची शिफारस केली होती.

केंद्रीय पुरातत्त्व विभागात गेली 12 वर्षे दिल्ली, गोवा, औरंगाबाद येथे कार्य केलेले डॉ. गर्गे हे संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात सर्वप्रथम येऊन सहा महिन्यांपूर्वीच गुवाहाटी मंडळांतर्गत ऐजॉल विभागात उपअधीक्षकपदी रुजू झाले होते. आता एमपीएससीच्या शिफारशीनुसार राज्य पुरातत्त्व विभागाचे प्रभारी संचालक सुशील गर्जे यांच्याकडून त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.

Web Title: after 20 years full time director for Archeology Department