
मंठा तालुक्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन या खरिपाच्या पिकाची चांगली वाढ झाली होती.
मंठा (जि.जालना) : तालुक्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने कापूस, तूर, उडीद, मूग, सोयाबीन या खरिपाच्या पिकाची चांगली वाढ झाली होती. भरपूर उत्पादन मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच उडीद, मूग, सोयाबीन पिक काढण्याच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीने तयार होत असलेला शेतीमाल पावसाने भिजून नुकसान झाले. तर कापाशीला भरपूर लागलेले बोंड सडल्याने कपाशीचे पिक उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. हाती आलेले पिक गेले. पिकाकरिता झालेला खर्च देखील निघाला नाही.
सतत पाऊस पडत असल्याने रब्बीच्या पेरणीला खूप उशीर झाला. तरीही अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने ज्या शेतातील ओल कमी झाली आहे, त्याठिकाणी शाळू ज्वारी, गहू व हरभऱ्याची पेरणी केली. पिकाची वाढ देखील चांगली झाली आहे. आजही अनेक शेतकरी कापसाचे पीक उपटून गहू, हरभऱ्याची पेरणी करीत आहे. रब्बीच्या पिकाची चांगली वाढ झाल्याने व पाणी साठा उपलब्ध असल्याने अनेक शेतकरी जीवाची पर्वा न करता रात्री-अपरात्री पिकास पाणी देत आहेत. परंतु मागील दहा-बारा दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने शाळू ज्वारी, गहू, हरभरा या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.