आत्महदहनाचा इशाऱ्यानंतर पोलिसांनी लावले नोकरीला 

अतुल पाटील
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगीराज नाटकर यांनी गुरुवारी (ता. 2) दुपारी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. लगेच त्यांनी काढून टाकली, मात्र स्क्रीनशॉट पोलिस आयुक्‍तांपर्यत पोहोचला.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी फेसबुकवरुन आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या योगीराज नाटकर यांना पोलिसांच्या मध्यस्थीने नोकरीची संधी मिळाली आहे. योगीराज इलेक्‍ट्रिशियन असून 16 ऑगस्ट पासून उद्योजक सचिन मुळे यांच्या श्रीहरी असोसिएटमध्ये रुजू होणार आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगीराज नाटकर यांनी गुरुवारी (ता. 2) दुपारी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. लगेच त्यांनी काढून टाकली, मात्र स्क्रीनशॉट पोलिस आयुक्‍तांपर्यत पोहोचला. पोस्टनुसार सातारा येथील पोलिस निरीक्षकांना कळविण्यात आले. मोबाईलच्या लोकेशननुसार त्याचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी योगीराजना घरी नेले. यावेळी ते भावनिक झाले होते. आई, वडिल, पत्नीसह तेरा वर्षाची मुलगी आणि नऊ वर्षाचा मुलगा आहे. वडील भाजीविक्रेते आहे. हाताला काम नसल्याने योगीराज उद्विग्न झाले होते. 

श्री. चंद्रमोरे म्हणाले, योगीराज यांची त्यांच्या कुटूंबासोबत भेट घडवून आणली, त्यादरम्यान सचिन मुळे यांचा फोन आला होता, तरुणाची उद्विग्नता त्यांच्या कानावर टाकली. त्यांनीही दाद देत योगीराजला भेटायला बोलावले. तो इलेक्‍ट्रिशियन असल्याचे समजल्यानंतर श्रीहरी असोसिएटमध्ये श्री. मुळे यांनी नोकरी दिली. 

अशी होती पोस्ट :
मी योगीराज नाटकर. 3-8-2018 रोजी रेणुकामाता कमान, बीड बायपास येथे सरकारला कंटाळून आत्मदहन करत आहे. याला सत्तेतल्या अवलादी जबाबदार असतील. अशी पोस्ट फेसबुकवर टाकण्यात आली होती. 

आत्महत्या करणे हा पर्याय नाही. तरुणांना यापासून परावृत्त केले पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परीने आधार देण्याची गरज आहे. 
- सचिन मुळे, उद्योजक, औरंगाबाद. 

मुलांनी हा मार्ग अवलंबू नये. ज्यांना काम पाहिजे, त्यांनी आमच्याकडे ऍप्रोच व्हावे, शैक्षणिक पात्रतेनुसार उद्योजकांना बोलता येईल. 
- प्रेमसागर चंद्रमोरे, पोलिस निरीक्षक, सातारा 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: After the suicide alert the police give the job to him