तब्बल दहा महिन्यांनंतर शाळा गजबजल्या; शिक्षकांच्या कोरोना तपासण्या वेगाने सुरू

Sakal
Sakal

जळकोट (जि.लातूर): तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर बुधवारपासून ता. २७ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षणाचा प्रवाह पुन्हा सुरू झाला असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे. वर्गात मित्र-मैत्रिणींसोबत बेंचवर बसण्याचा आनंद लुटण्यासाठी शाळकरी मुले आतूर झाली होती.

विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश देताना पालकांचे संमत्तीपत्र सक्तीचे असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. तशा सूचना शिक्षकांनी पालकांना दिल्या आहेत. जिल्ह्यात नव्याने कोरोनाबाधितांचे प्रमाण सध्या अत्यल्प असल्याने पालकांचा आत्मविश्वास वाढला आहे. शिवाय लसीकरणही सुरू झाल्याने पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी सकारात्मकही आहेत. शिक्षकांच्या कोरोना तपासण्या वेगाने सुरू आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुकास्तरावर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्रांमध्ये सोय केली आहे. मोठ्या संख्येने शिक्षक असलेल्या शाळांत आरोग्य कर्मचारी स्वत: जात आहेत, तर उर्वरित ठिकाणी शिक्षक स्वत:च चाचणी केंद्रात जात आहेत. सध्या रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या सुरू आहेत. १५ मार्चपासून विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. त्यामुळे नव्या आरंभासाठी ते उत्सुक आहेत. मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणार याचीही उत्सुकता लागली होती.

तीन-चार महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात फारसे शिरलेले नाही.ऑनलाइन शिक्षणात तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करायला लागतोय. मोबाइल उपलब्ध नसण्यापासून रेंज नसण्यापर्यंतची डोकेदुखी विद्यार्थ्यांपुढे आहे.मुले महिनो न महिने घरीच राहिल्याने पालकही चिंतीत होते. घरातील दोघा-तिघा मुलांना एकच मोबाईल कसा पुरणार, ही मोठी समस्या त्यांच्यापुढे होती. जिल्हा परिषद शाळांचे विविध शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल अत्यंत चांगले आहेत. खासगी शाळांना याबाबतीत कोसो दूर फेकले आहे. पण वर्ग सुरू नसल्याने ही गुणवत्ता कशी टिकणार, हा प्रश्न विद्यार्थी, शिक्षक व पालकांपुढे आहे.

वर्गांची तयारी सोमवारपासूनच-
शाळांमध्ये पुनश्च हरिओम करण्यासाठी शिक्षकांची तयारी सोमवारपासाूनच सुरू झाली. मंगळवारच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छता व इतर तयारीसाठी शिक्षक सकाळपासूनच कामाला लागले होते. काही शाळांमध्ये वर्गांचे निर्जंतुकीकरण रविवारपासूनच सुरू झाले. काही ठिकाणी ग्रामपंचायतींनी स्वच्छतेसाठी साहित्य दिले, तर काही ठिकाणी पालक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, फवारणी पंप उपलब्ध करून दिले. छोट्या गावांत खुद्द मुलेच साफसफाईच्या कामासाठी स्वेच्छेने पुढे आल्याचे दिसले.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com