कांदा उत्पादकांच्या पदरी पुन्हा निराशाच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

पावसामुळे कांदा नासल्याने मोठा फटका

परंडा (जि. उस्मानाबाद) : तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांनी उसाला सक्षम पर्याय म्हणून कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र परतीच्या पावसामुळे कांद्याचे पीक शेतातच नासले. परिणामी, कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी पावसामुळे शेतातील कांदा नासल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली. 

पावसाने दगा दिल्याने या भागातील धरणांत मुबलक पाणीसाठा झाला नाही. उसाला कायम लागणारे पाणी उपलब्ध नसल्याने अनेकांनी कांद्याची लागवड केली. चांगला भाव मिळत असल्याने तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. कंडारी, सोनारी, साकत, अनाळा, उंडेगाव, पांढरेवाडी, चिंचपूर (बुद्रुक) या भागात मोठ्या प्रमाणात काद्यांची लागवड झाली आहे. कमी दिवसांत येणाऱ्या या पिकाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी होता. मात्र परतीच्या पावसाने सलग हजेरी लावल्याने कांद्याचे पीक पाण्यातच अनेक दिवस राहिले.

परिणामी, कांद्याला पाणी लागल्याने कांदा जागेवरच खराब झाला आहे. चिखलातील कांदा काढता येत नसल्याने पाऊस उघडण्याची वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याने शेतातच कांदा नासला गेला. त्यातून निवडलेल्या कांद्याला एक रुपये ते दीड रुपये किलो भाव मिळत आहे. अडत बाजारात नासलेल्या कांद्याची दुर्गंधी सुटत आहे. सध्या चांगल्या कांद्याला 30 ते 40 रुपये प्रतिकिलो भाव मिळत असताना या भागातील शेतकऱ्यांचा कांदा वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वेळचे कांद्याचे अनुदान अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. त्यातच पुन्हा कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावे लागले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again disappointment of the farmers