रेकॉर्डवरील अकराशे संशयित पोलिसांच्या रडारवर 

उमेश वाघमारे 
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

जालना : विविध कलमांखाली कारवाईसाठी प्रस्ताव सादर, 18 हद्दपारीचे, तर दोन एमपीएडीअंतर्गत 

जालना -  विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून संशयित आरोपींच्या जुन्या रेकॉर्डची झाडाझडती सुरू आहे. आतापर्यंत तब्बल अकराशेपेक्षा अधिक रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगारांविरोधात पोलिसांकडून तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. तर 18 हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले असून, त्यापैकी सात प्रस्ताव निकाली काढण्यात आलेत. तर एमपीडीए कायद्याअंतर्गत दोन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची असते. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर संशयित गुन्हेगारांच्या रेकॉर्डची झाडाझडती सुरू होते. रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगारांची यादी तयार करून विविध कलमांखाली त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाते. 
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर पोलिसांनी तब्बल एक हजार 119 रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. यात कलम 107 अंतर्गत 840, कलम 110 अंतर्गत 186, कलम 144 अंतर्गत 29 तर कलम 93 अंतर्गत 44 प्रस्ताव पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यातील त्या-त्या तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 18 हद्दपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सात प्रस्ताव निकाल काढण्यात आले असून आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायदा (एमपीडीए) अंतर्गत दोन प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रस्ताव जसजसे निकाली निघतील, त्यानुसार प्रस्तावित रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार आहे. 

निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे असते. त्यानुसार जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींविरोधात विविध कलमांखाली तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. 
- चैतन्य एस. , पोलिस अधीक्षक, जालना. 

-------
रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यावर भर दिला जातो आहे. निवडणुकीच्या काळात शांतता राहावी यासाठी पोलिस प्रशासन काम करीत आहे. 
- राजेंद्रसिंह गौर , स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक, जालना. 
 -------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: against criminals