पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट ठरतेय डोकेदुखी 

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र


औरंगाबाद -  शासनाने या वर्षापासून पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय 30 सप्टेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मुलाचे वय पाच वर्षे अकरा महिने भरत असले, तरी पहिलीच्या प्रवेशासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा अनेक पालकांना फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने शाळा प्रवेशासाठी वयात 15 दिवसांपर्यंत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ज्या मुलांना सहा वर्षे वयासाठी एक, दोन महिने कमी पडत आहेत; ते सहा वर्षे दाखविण्यासाठी खोट्या जन्मतारखेचा आधार घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवेशासाठी पूर्वीचीच वयोमर्यादा करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. 

शासनाकडून पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याची वयोमर्यादा निश्‍चित करण्याबाबत दरवर्षी बदल केलेले आहेत. 2015-16 यावर्षी पाच वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश देण्यात आला होता. 2016-17 मध्ये या वयोमर्यादेत वाढ करून पाच वर्षे चार महिने करण्यात आले होते. त्यानंतर 2017-18 या शैक्षणिक वर्षात पाच वर्षे आठ महिने केले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिलीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत पुन्हा चार महिन्यांनी वाढ करीत आता सहा वर्षे करण्यात आले आहे. त्यामुळे सहा वर्षे पूर्णत्वासाठी अगदी वीस दिवस बाकी असलेल्या पालकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 

खोट्या जन्मतारखेची 
केली जातेय नोंद 

ज्या विद्यार्थ्यांचे वय सहापेक्षा कमी आहे किंवा सहा वर्षे पूर्णतेसाठी एक दिवस ते पाच महिन्यांचा कालावधी कमी पडत आहे, त्यांना पहिलीसाठी एक वर्ष थांबणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे पालक जन्मतारखा बदलविताना दिसत आहेत. पालक शाळेकडे जन्माच्या तारखांबाबत प्रतिज्ञापत्र करून देत आहेत. त्यामुळे बालकाची खरी जन्मतारीख व शाळेत नोंदविलेली जन्मतारीख यात फरक दिसत आहे. तर काही पालकांनी आधारकार्डवरील जन्मतारीख बदलणे सुरू केले आहे. 

पालक म्हणतात... 
30 सप्टेंबर 2019 पर्यंत माझ्या मुलीचे वय पाच वर्षे 11 महिने तीन दिवस इतके होते. त्यामुळे पहिलीत प्रवेश घेतला. केवळ 27 दिवसांनी वय कमी भरत असल्यामुळे सरल पोर्टलवर नोंदणीत अडचण येत आहे. त्यामुळे पहिलीचा प्रवेश रद्द करून पुन्हा बालवर्गात प्रवेश घेतला आहे. आता 15 दिवसांची शिथिलता देण्यात आली आहे. म्हणजे फक्त 12 दिवसांसाठी तिचे नुकसान होत आहे. मग पुढच्या वर्षी ती सात वर्षांची होईल तेव्हा तिला पहिलीत टाकायचे का? केवळ 12 दिवस कमी भरत असल्यामुळे तिचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. 
- अभिजित हिरप, पालक 

पालकांचे शासन निर्णयाबाबत प्रश्न 
- दरवर्षी पहिलीच्या प्रवेशाचे निकष का बदलले जातात? 
- पुढच्या वर्षी इयत्ता पहिलीसाठी वयाची मर्यादा कमी केल्यास 
जुन्या विद्यार्थ्यांची नुकसानभरपाई कोण करणार? 
- जून महिन्यात शैक्षणिक वर्षाला सुरवात होते. मग विद्यार्थी वयोमर्यादा निश्‍चिततेसाठी 30 सप्टेंबरऐवजी 30 मे ही तारीख घेता येऊ शकत नाही का? 


""शासनाकडून दरवर्षी पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्‍चिततेत बदल करण्यात येतो. यंदा ठरविलेल्या सहा वर्षे वयोमर्यादेमुळे अनेक पालकांमध्ये संभ्रम आहे. शासनाने वयोमर्यादेबाबतचा आदेश प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याच्या आधी म्हणजे मार्च-एप्रिलमध्येच काढायला हवा होता. कारण आता पालकांनी मुलांचे प्रवेश घेतले आहेत. कमी वयामुळे अनेक पालकांनी घेतलेले प्रवेश सरल प्रणालीमध्ये अपलोड होत नाहीत. त्यामुळे पालक मुलांचे प्रवेश काढून घेत आहेत. किमान यावर्षी तरी शासनाने वयोमर्यादेची अट शिथिल करावी.'' 
- प्रदीप विखे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com