बचत गटाच्या एजंटला लुटले; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

प्रल्हाद कांबळे 
रविवार, 19 मे 2019

- बचत गटाच्या एजंटला लुटले

नांदेड : बचत गटाची वसुली करून भोकरकडे मित्रासोबत दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना रस्त्यात अडवून मारहाण केली. त्यांच्याकडील एक लाख ६५ हजार ४७५ रुपये जबरीने चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी (ता. १७) दुपारी दोनच्या सुमारास डौर ते सायाळ रस्त्यावर घडली.

भोकर तालुक्यातील डौर येथील बाबासाहेब राजकुमार जोंधळे (वय २७) रा. चिखलवाडी, भोकर हा आपला मित्र अनिल कदम हे दोघेजण बचत गटाचे पैसे घेऊन दुचाकी (एमएच२६-बीएल-१६९१) डौर ते भोकर येत होते. डौरपासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांची दुचाकी येताच पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारने दुचाकीला धडक दिली. कारमधील अनोळखी चोरट्यांनी खाली उतरून दुचाकीस्वारांना लाकडी दांड्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांच्याजवळील रोख रक्कम एक लाख ६५ हजार ४७५ आणि पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल, १० हजाराचा लॅपटॉप असा एक लाख ६५ हजार ४७५ रुपयाचा ऐवज जबरीने चोरून घेऊन पसार झाले.

रुग्णालयात उपचार घेऊन बाबासाहेब जोंधळे हे भोकर पोलिस ठाण्यात गेले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अनोळखी तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सुर्यवंशी हे करीत आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agent of Bachat Gat Looted in Nanded