पहिलीच्या वर्गात अवतरली ‘अग्गोबाई ढग्गोबाई...’

सुशांत सांगवे
रविवार, 1 जुलै 2018

चिमुकल्यांसह आजी-आजोबांनाही डोलायला लावणाऱ्या ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या बालगीताचा पहिलीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-शाळांमध्ये सध्या या गीताचे स्वर घुमू लागले आहेत आणि मुले नाचत-उड्या मारत या गाण्यात गुंतत आहेत.

लातूर - चिमुकल्यांसह आजी-आजोबांनाही डोलायला लावणाऱ्या ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या बालगीताचा पहिलीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-शाळांमध्ये सध्या या गीताचे स्वर घुमू लागले आहेत आणि मुले नाचत-उड्या मारत या गाण्यात गुंतत आहेत.

यंदा पहिलीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. त्यानूसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे (बालभारती) नुकतेच पहिलीचे पुस्तक बाजारात आले आहे. ते शाळा-शाळांपर्यंत पोचलेही आहे. ‘मराठी बालभारती’ या पुस्तकाचे पहिले पान उलटताच मुलांपर्यंत आधीच पोचलेली आणि त्यांना मनापासून आवडलेली कवी संदिप खरे यांची ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ ही कविता पाहायला मिळत आहे. ही कविता स्वर-तालात गात पहिलीतील मुले शाळांमध्ये रमत आहेत. या कवितेबरोबरच शांता शेळके यांच्या ‘टपटप टपटप टाकित टापा’, राजा मंगळवेढेकर यांच्या ‘असे कसे? असे कसे?’, मंगेश पाडगावकर यांच्या ‘वेडं कोकरू खूप थकलं’ अशा साभिनय म्हणता येऊ शकणाऱ्या आठ गीतांचा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

पाठ्यपुस्तकासंदर्भात ‘बालभारती’च्या मराठी भाषा तज्ञ समितीच्या सदस्या सविता वायळ म्हणाल्या, ‘‘विद्यार्थ्यांसमोर पारंपारिक गीतांबरोबरच आजची चांगली गीते यावीत, त्यात ती रमावीत म्हणून अग्गोबाई ढग्गोबाई कवितेची निवड झाली आहे. अशी गाणी हे पुस्तकाचे वेगळेपण आहे. याबरोबरच, पहिलीत शिकणारी मुले बोलताना जे-जे शब्द वापरतात त्या शब्दांवर आधारित ‘अक्षरगट’ पुस्तकात देण्यात आला आहे. त्याआधी आम्ही विविध शाळांमध्ये जाऊन मुलांना कोणकोणते शब्द अधिक परिचयाचे आहे, हे पाहीले आहे. वाचनपाठ, प्रकट वाचन, शब्दखेळ यावर भर देण्यात आला आहे. याची मांडणी करताना अधिकाधिक चित्रांचा समावेश करण्यात आला आहे.’’

आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळतात. काही पुरस्कार ठराविक साच्याचे असतात; पण पाठ्यपुस्तकात कविता छापून येणे ही घटना या सर्वांपेक्षा मोठा पुरस्कार आहे, असे मला वाटते. जी पुस्तके वाचत-वाचत मला कवितेची गोडी लागली त्याच पुस्तकात माझी कविता प्रसिद्ध झाल्याने एक वर्तूळ पूर्ण झाल्याचे समाधान आहे, असे मत कवी संदीप खरे यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: aggobai dhaggobai published in frist class