जालन्यात जागावाटपामुळे आघाडी लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

जालना - भाजप-शिवसेना युती तुटल्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा जालना जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार हे निश्‍चित आहे. मात्र, आघाडीबाबत दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. जिल्हा परिषद गटाच्या अधिकच्या जागांसाठी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आघाडीचा निर्णय लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.

जालना - भाजप-शिवसेना युती तुटल्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा जालना जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार हे निश्‍चित आहे. मात्र, आघाडीबाबत दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. जिल्हा परिषद गटाच्या अधिकच्या जागांसाठी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आघाडीचा निर्णय लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात 56 जिल्हा परिषद गट व 112 पंचायत समिती गणांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी प्रारंभीपासूनच प्रमुख पक्षांनी आपआपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेत एकप्रकारे स्वबळावर लढावे लागल्यास तशी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे.

युतीमध्ये प्रारंभीपासूनच धुसफूस सुरू होती. भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये जालना शहरातील विकासकामांच्या श्रेयवादावरून काही दिवसांपूर्वी चांगलीच तू तू मैं मैं झाली. या पार्श्‍वभूमीवर युती होणार नाही, असे वाटत असताना जागावाटपासाठी भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या. मात्र, आता युतीचा कायमचा काडीमोड झाल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे आघाडीच्या निर्णयाबाबत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे.

कॉंग्रेसचे पदाधिकारी भोकरदन, बदनापूर, जालना, मंठा येथे अधिकच्या जागांबाबत आग्रही आहेत. तर घनसावंगी, अंबड तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव अधिक आहे. कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 25 जिल्हा परिषद गटांच्या जागांचा प्रस्ताव दिला आहे. तर कॉंग्रेसला 20 पेक्षा अधिकच्या जागा सोडणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली आहे. पंचायत समिती गणासाठी 56-56 जागांचा निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले. आघाडीचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, युती तुटल्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी शिवसेना व कॉंग्रेसमध्ये दुहेरी तर काही जागांवर शिवसेना, भाजप व कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे.

आघाडीबाबत सकारात्मक
डॉ. निसार देशमुख (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस) : जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही कॉंग्रेससोबत आघाडी करण्याबाबत सकारात्मक आहोत. मंठा, बदनापूर तसेच जालना तालुक्‍यातील काही जागा सोडण्याबाबत कॉंग्रेस पक्ष आग्रही भूमिका घेत आहे. त्यामुळे आघाडीबाबतचा अंतिम निर्णय घेण्याबाबत अडचण होत आहे.

एकत्र लढविण्याची भूमिका
सुरेशकुमार जेथलिया (जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकजूट होऊन लढवावी हीच आमची भूमिका आहे. सध्या जागावाटपात काही जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत; मात्र लवकरच आघाडीबाबत निर्णय होईल, अशी आशा आहे.

Web Title: aghadi confussion in seat distribution