गाढवाच्या प्रतिमेची पूजा करून सरकारचा निषेध 

राजेभाऊ मोगल
शनिवार, 9 जून 2018

या आंदोलनात संतोष पवार, तात्याराव कारके, नितीन आव्हाड, डॉ. सचिन साबळे, मुकेश जाधव, अशोक तांबे, सुवर्णा साबळे, राजश्री साठे, सोपान नाडे, पांडुरंग खोतकर, विजय वाघुले, प्रमोद काळे, आशिष घोरपडे आदींचा समावेश होता.

औरंगाबाद - अनुसूचित जाती आरक्षणाची अ, ब, क, ड वर्गवारी करून मातंग समाज व तत्सम जातींना आरक्षणाअंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करत लहू प्रहार संघटनेने शुक्रवारी (ता. 8) सकाळी अकराला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाढवाच्या प्रतिमेची पूजा केली. 

यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले, की आरक्षणप्रश्‍नी मातंग समाजातील विविध संघटना मागील 40 वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या कालावधीत "सबका साथ सबका विकास' अशी ग्वाही देत भाजपने सत्ता मिळविली. सत्ता मिळताच दिलेल्या आश्‍वासनांचा त्यांना विसर पडला आहे. यामुळे संपूर्ण मातंग समाज सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. एकीकडे मातंग युवकांना विकासाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या रोजगाराभिमुख योजना चार वर्षांपासून बंद आहेत; तर दुसऱ्या बाजूला समाजावर अन्याय-अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात येत्या 101 दिवसांत निर्णय न झाल्यास 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्‍ती संग्रामदिनी राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला. 

या आंदोलनात संतोष पवार, तात्याराव कारके, नितीन आव्हाड, डॉ. सचिन साबळे, मुकेश जाधव, अशोक तांबे, सुवर्णा साबळे, राजश्री साठे, सोपान नाडे, पांडुरंग खोतकर, विजय वाघुले, प्रमोद काळे, आशिष घोरपडे आदींचा समावेश होता.

Web Title: agitation against government in Aurangabad