पाण्यासाठी उद्रेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

औरंगाबाद - पावसाळा तोंडावर आला असला तरी शहरात पाण्यासाठी उद्रेक सुरूच असून, सोमवारी (ता. २८) एमआयएम नगरसेवकांनी शहागंज येथील पाण्याच्या टाकीवर उपोषण केले; तर भाजप नगरसेविकेने राजीनामा अस्त्र उपसले. महापौरांनी नगरसेवकांची समजूत काढत रात्री उशिरा बैठकीचे आयोजन केले असून, पदाधिकाऱ्यांना माहिती न देता मुंबईला गेलेले कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

औरंगाबाद - पावसाळा तोंडावर आला असला तरी शहरात पाण्यासाठी उद्रेक सुरूच असून, सोमवारी (ता. २८) एमआयएम नगरसेवकांनी शहागंज येथील पाण्याच्या टाकीवर उपोषण केले; तर भाजप नगरसेविकेने राजीनामा अस्त्र उपसले. महापौरांनी नगरसेवकांची समजूत काढत रात्री उशिरा बैठकीचे आयोजन केले असून, पदाधिकाऱ्यांना माहिती न देता मुंबईला गेलेले कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांचा टाहो सुरू आहे. अनेक भागांत नळाला सहा-सात दिवसांनंतरही पाणी येत नसल्याने पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलने केली जात आहेत. जुन्या शहरात सोमवारी सातव्या दिवशीही पाणी न आल्याने एमआयएमचे नगरसेवक नासेर सिद्दीकी, जमीर कादरी, तसेच डॉ. अफजल खान, आरेफ हुसेनी, सईद फारुकी यांच्यासह संतप्त नागरिक सकाळी साडेदहा वाजता शहागंज येथील पाण्याच्या टाकीवर जमा झाले. या वेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांनी उपोषण सुरू केले. त्यानंतर दुपारी महापौर नंदकुमार घोडेले, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. रमजानचा महिना सुरू असताना सात दिवस पाणी मिळत नसेल, तर अधिकारी काय करतात? असा प्रश्‍न नागरिक, नगरसेवकांनी महापौरांना केला. त्यावर महापौरांनी सायंकाळपर्यंत या भागात पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले व रात्री दहा वाजता महापौर दालनात बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

चहेल यांना नोटीस बजावण्याचे आदेश
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांचे नियंत्रण राहिलेले नाही. पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता ते मुंबईला कसे काय गेले? असा सवाल करीत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश महापौरांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

भाजप नगरसेविकेची समजूत 
भाजप नगरसेविका जयश्री कुलकर्णी यांनी वॉर्डातील पाण्याचा प्रश्‍न मिटत नसल्याने आपल्या पदाचा महापौरांकडे राजीनामा दिला; मात्र माझ्यापर्यंत राजीनामा आलेलाच नाही, असे महापौरांनी सांगितले. दरम्यान, महापौरांनी नगरसेविका पतीची समजूत काढल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिडकोत टॅंकरचालकांना मारहाण; पाणीपुरवठा बंद
आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही, टॅंकर कशाला भरता, असे म्हणत सिडको एन-सात येथे पाण्याच्या टाकीवर सायंकाळी काही संतप्त तरुणांनी टॅंकरचालकांना मारहाण केली. तब्बल तासभर टाकीवर हा गोंधळ सुरू होता. आंबेडकरनगर व आसपासच्या विविध वॉर्डांमध्ये राहणारे हे तरुण असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी धाव घेऊन नियमित पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे तरुण निघून गेले. त्यानंतर टॅंकरचा पाणीपुरवठा सुरळीत झाला.

Web Title: agitation for water