उस्मानाबाद: येडशी टोलनाक्यावर टोलमाफीसाठी आंदोलन

अर्जुन सुतार
सोमवार, 28 मे 2018

येडशी ते तामलवाडी या मार्गावर लातूरमार्गे आळणी ते उस्मानाबाद, उस्मानाबाद ते तुळजापूर, तुळजापूर ते तामलवाडी, येडशी ते येरमाळा या मार्गावर अंतर्गत गावांना कोठेही टोल भरावा लागत नाही. परंतु येडशी येथील टोलनाक्याच्या पलिकडे अनेक शेतकऱ्यांना दैनंदिन कामासाठी जावे लागते.

येडशी : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशी (ता. उस्मानाबाद) येथील टोलनाक्यावर टोलमाफी करावी, या मागणीसाठी येडशी व परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी (ता. २८)  सकाळी दहापासून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

येडशी ते तामलवाडी या मार्गावर लातूरमार्गे आळणी ते उस्मानाबाद, उस्मानाबाद ते तुळजापूर, तुळजापूर ते तामलवाडी, येडशी ते येरमाळा या मार्गावर अंतर्गत गावांना कोठेही टोल भरावा लागत नाही. परंतु येडशी येथील टोलनाक्याच्या पलिकडे अनेक शेतकऱ्यांना दैनंदिन कामासाठी जावे लागते. येडशी गावातील नागरिकांना शासकिय व वैद्यकीय कामांसाठी उस्मानाबादला दररोज ये-जा करावी लागते. अनेकवेळा रुग्णवाहिकेऐवजी खासगी वाहनातून रुग्ण घेऊन जाण्याची वेळ येते. अशा वाहनांनाही टोलसाठी अडवले जाते. याबबत अनेक वेळा आयआरबी कंपनीला निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. परंतु अद्यापही येडशीच्या ग्रामस्थांना टोलमुक्ती झाली नाही. 
टोलमुक्ती व्हावी म्हणून येडशी येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, जिल्हधिकारी, पोलिस अधीक्षक, खासदार, आमदारांना निवेदन दिले होते. टोलमुक्ती करावी म्हणून १७ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवार टोलनाक्यावर सकाळी दहाच्या सुमारास ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.  

या टोलनाक्यावरील आयआरबीचे प्रोजेक्ट मॅनेंजर महादेव तुपेरे यांनी वरिष्ठांना माहिती दिली, परंतु त्यांचा प्रतिसाद आला नाही. यावेळी तहसीलदार सुजित नरहिरे, पोलिस उपअधीक्षक मोतीचंद राठोड, उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, अनिल विपीन, तलाठी व्ही. के. डोके आदींनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी  पंचायत समितीचे सदस्य संजय लोखंडे, सरपंच गोपाळ नागटिळक, उपसरपंच सुधीर सस्ते, बाळासाहेब देवकर, नाना पवार, संजय पाटील, चंदन नलावडे, राजाभाऊ अवधूत,नितीन शिदे, पंकज शिदे, नाना सस्ते, महेश नलावडे, श्माम गोरे, पप्पू तौर, तुषार शिदे, काका देशमुख, अशोक देशमुख, दिपक पवार, संदेश पवार, रामलिंग भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: agitation in Yedshi toll plaza Osmanabad