
Agricultural News : शेतमाल आज विकला, उद्या भाव वाढला तर
मंठा : आज भाव मिळेल, उद्या मिळेल म्हणत आता शेतमाल घरात विक्रीविना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून साठविलेला आहे. समजा आज शेतमाल विकला आणि उद्या भाव वाढला तर, अशी द्विधा अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. शेतीसाठी घेतलेले खासगी कर्ज, उधारी, उसनवारीची फेड करण्याबाबतही तगादा वाढत आहे, पण शेतमालाचे भाव काही वाढण्यास तयार नाही.
तीस चाळीस वर्षांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे बोलले जात होते. परंतु आता निसर्गाची अवकृपा, पिकाकरिता वाढलेला खर्च, शेतीमालाला हमीभाव नाही व इतर कारणामुळे शेती व्यवसाय आता बिनभरवशाचा झाला आहे. गेल्या खरीप हंगामात उशिरा पेरणी व अतिवृष्टीने शेतीसह पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर यातून वाचलेल्या पिकाला सुरुवातीला बरा भाव होता.
परंतु नंतर बाजारात शेतीमालाची आवक वाढल्यानंतर शेतीमालाचे भाव कमी होत गेले आहे. शेतीचा हंगाम संपत आला तरी शेतीमालाचा भाव वाढेनासा झाला आहे. परिणामी सध्या शेतीमाल विकावा किंवा आणखी काही दिवस थांबावे या द्विधा स्थितीत शेतकरी आहेत. मागील वर्षी हंगामाच्या शेवटी शेवटी मोजक्या शेतकऱ्याच्या कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. म्हणून यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशीच्या पीक क्षेत्रात वाढ केली होती.
शेतकऱ्याचा नुकताच कापूस निघत असताना नोव्हेंबर महिन्यात कापसाला नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. परंतु नंतर बाजारात कापसाची आवक वाढत असताना भाव उतरत गेला असून सध्या कापूस ८ हजार १०० ते ८ हजार २०० रुपये प्रति क्विंटल दराने व्यापारी खरेदी करीत आहे.
मागील वर्षी कापसाचा हंगाम संपताना भाव वाढले होते. यावेळी देखील कापसाचे भाव वाढतील अशी शेतकऱ्याना अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेनुसार कापसाची विक्री करून शिल्लक कापूस घरात साठवून ठेवला आहे. परंतु आता कापूस, सोयाबीन, तूर हा शेतीमाल साठवून ठेवण्यास जागा नाही.
घरात अडचण निर्माण होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. उसनवारीने पैसा दिलेले तसेच सावकार आता तगादा लावीत आहेत. व्याजाने घेतलेल्या पैशाचे व्याज देखील वाढत आहे. अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, तुरीचे भाव वाढले तरी देखील बाजारात आवक कमी असल्याचे अडत व्यापारी विलास उन्हाळे यांनी सांगितले आहे.
असे आहेत सध्या भाव
सध्या बाजारात नवा गहू २ हजार ८०० ते ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल. हरभरा ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. सोयाबीनची विक्री सुरुवातीला पाच हजार सातशे रुपये क्विंटल दराने विक्री झाली. आता सोयाबीनची पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. अगोदर तुरीचे भाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल होते, सध्या तुरीची विक्री सात हजार चारशे ते सात हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल दराने होत आहे.