कृषी पर्यटनातून शेतीचा विकास

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 16 मे 2017

वेरूळजवळ कसाबखेड्याला "चैतन्य'चे नवे आकर्षण

वेरूळजवळ कसाबखेड्याला "चैतन्य'चे नवे आकर्षण
औरंगाबाद - वेरूळ, अजिंठा आणि इतर भरपूर ऐतिहासिक पर्यटनक्षेत्रांमुळे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहेच; पण आता नवनवीन पर्यटन केंद्रेही विकसित केली जात आहेत. त्यातच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या कसाबखेडा गावातील चैतन्य कृषी पर्यटन केंद्राने नवी ओळख निर्माण केली आहे.

शहरातील व्यावसायिक हरीश जाखेटे यांनी 2011 मध्ये आपल्या शेतीत एक आगळेवेगळे कृषी पर्यटन केंद्र थाटले. शेतीत सेंद्रिय प्रयोग, विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती, आमराई, फळांच्या बागा आणि पाण्याने तुडुंब भरलेली विहीर पाहून कुणी प्रसन्न न झालं तरच नवल! जोडीला राहण्याची, जेवणाची उत्तम सोय, भरउन्हातही थंडगार राहणारा इथला चौसोपी दगडी वाडा आणि त्यात लावलेली बैठक मन रमवते. आंब्याच्या सावलीत हुरडा पार्टी करायला येणारे पर्यटक जेवणातला गूळ-भाकरीच्या चुरम्याचा लाडू खाऊन अक्षरशः विरघळतात. पर्यावरणाबद्दल जागृती करणारे फलक नागरिकांना जागोजागी निसर्गाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतात.

प्रशिक्षित पर्यटक सहायक
पर्यटकांच्या साहाय्यासाठी श्री. जाखेटे यांनी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण दिले आहे. यातून हुरडा भाजणारे, बैलगाडीची सफर करविणारे, शेती सांभाळणारे, जनावरे राखणारे, पर्यटकांची काळजी घेणारे अशा सुमारे चाळीस जणांना रोजगारही मिळाला आहे. साहसी खेळांचे पर्यटकांना प्रशिक्षण देणारी टीम भन्नाट आहे. पर्यटकांना सेवा देताना त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करण्याचे संवादकौशल्य हे या फार्मवरील सर्वांचे वैशिष्ट्य.

झिरो बजेट शेतीचे मार्गदर्शन
शेती करताना रासायनिक खतांना फाटा देत शेण आणि गोमूत्राच्या साथीने करण्यात येणारा "झिरो बजेट शेती'चा प्रयोग श्री. जाखेटे आणि त्यांच्या साथीदारांनी यशस्वी केला आहे. हा प्रकल्प पाहण्यासाठी लांबवरून शेतकरी या ऍग्रो फार्ममध्ये येतात. त्यांना येथे गांडूळ खत, नव्या अवजारांची माहिती देण्यात येते.

साहसी खेळियाडमधून संघभावनेची जोपासना
अस्सल ग्रामीण भोजनासह येथे उभारण्यात आलेल्या साहसी खेळांची संख्याही मोठी आहे. आर्टिफिशियल रॉक वॉल, बर्मा ब्रीज, पॅरलल रोप, हॉरिझंटल ब्रीज, ऑस्ट्रेलियन वॉक, डॅंगल ड्यूओ, कार्गो नेट, हॅंगिंग ब्रीज, टायर ट्रॅव्हर, बॅलन्सिंग बिम आणि इतरही अनेक खेळांतून मनोरंजनाबरोबरच टीमवर्क, धाडस आणि आव्हानांचा सामना करण्याचे प्रशिक्षणही मुलांना मिळते. सध्याच्या व्हर्च्युअल जमान्यात प्रत्येकजण टीव्ही आणि मोबाईल गेम्स खेळण्यात गुंतला आहे. त्यांनी येथील साहसी खेळांचा आनंद घ्यावा आणि त्याच्या माध्यमातून सांघिक भावना वाढीस लागावी, हाच या साहसी खेळियाडचा उद्देश असल्याचे श्री. जाखेटे म्हणाले.

Web Title: agriculture development in agriculture tourism