मका पिकावर लष्करी अळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

अनाळा (जि.उस्मानाबाद) ः अनाळासह परिसरातील रत्नापूर, मलकापूर, इनगोदा, कार्ला, रोहकल परिसरात बहरलेल्या मका पिकावर अमेरिकन लष्करी अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने हे पीक पूर्णपणे धोक्‍यात आले आहे. 

परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्‍याची पेरणी केली आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत या पिकापासून जनावरांना चारा उपलब्ध होईल, या भरवशावर पेरा केला होता. परंतु मका पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तो चारा जनावरांना घातल्यास जनावरे दगावण्याची शक्‍यता बळावली आहे. मक्‍याच्या एका रोपट्यात तीन ते चार अळ्या आतील भागात दिसून येत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्याला फवारणी करण्याचे आवाहन केले होते; परंतु त्या फवारणीने काहीच परिणाम झाला नसल्याने कृषी विभागही मार्गदर्शन करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. पिकावर फवारणी करूनही त्याचा काहीच परिणाम दिसून येत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. 

मका पिकापासून उत्पादन तर मिळणार नाहीच, परंतु चाराही मिळणार नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. गत तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळलेला शेतकरी यंदा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता; परंतु सतत फक्त रिमझिम पाऊस होत गेल्याने पिकेही चांगली आली होती; परंतु पिकांवर अनेक प्रकारचा रोग पडल्याने उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture News