फुलोऱ्यातील पिकावर अळीचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

गेल्या आठवड्यातील ढगाळ वातावरण अन्‌ भुरभुर पावसामुळे खरीप पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असतानाही कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने पिके हातातून जाण्याचा धोका आहे.

जेवळी (जि.उस्मानाबाद) ः गेल्या आठवड्यातील ढगाळ वातावरण अन्‌ भुरभुर पावसामुळे खरीप पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असतानाही कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने पिके हातातून जाण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीतही कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. 

लोहारा तालुक्‍यात गेल्या तीन-चार वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे नदी, नाले, ओढे एकदाही वाहिले नाहीत. परिणामी विहिरी, तलाव कोरडे राहिल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यंदा अद्याप एकही मोठा पाऊस झाला नसल्याने दुष्काळीस्थिती कायम आहे. लोहारा तालुक्‍यात आतापर्यंत 334 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस वार्षिक सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. 

उशिरा झालेल्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. त्यानंतरही अधूनमधून झालेल्या भीज पावसाने शिवार बहरले; परंतु गेल्या आठवड्यात सलग सुरू असलेली पावसाची भुरभुर, ढगाळ वातावरणामुळे पिकांना फटका बसला आहे. शिवारातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांवर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. फूल धारणेच्या अवस्थेत असताना अळ्या पीक फस्त करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी सुरू केली आहे. मात्र, दोन-तीन वेळा फवारणी करूनही कीडरोग आटोक्‍यात येत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. यातच कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. 

महागडी खते, बियाणे खरेदी करून कमी ओलीवर पेरणी केली; परंतु आता पिके फुलोऱ्यात असताना अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेकवेळा फवारणी करूनही कीड नियंत्रणात येत नसल्याने यंदाही हातात काहीही पडणार नाही. 
- मल्लिनाथ वलदोडे, शेतकरी, जेवळी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture News