सोयाबीनच्या एका झाडाला पाच ते दहा शेंगा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अत्यल्प पावसामुळे काढणीचा खर्च निघणेही अवघड 

वाशी (जि.उस्मानाबाद) : अत्यल्प पावसामुळे यंदाही खरीप हंगामातील पिके हातातून जाण्याची शक्‍यता आहे. अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या एका झाडाला केवळ पाच ते दहाच शेंगा लगडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीच्या खर्चाएवढेही उत्पन्न मिळण्याची शाश्वती नसल्याने सोयाबीनची काढणी करावी की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी अडकले आहेत.

सोयाबीनच्या झाडांना माळरान हलक्‍या प्रतीच्या जमिनीवर सरासरी 40 ते 50 शेंगा लागणे अपेक्षित असते, तर भारी व काळ्या जमिनीवर सरासरी 70 ते 100 शेंगा लागणे अपेक्षित असते. मात्र, यावर्षी परिसरातील काही गावांत अवघ्या पाच ते दहाच शेंगा लागलेल्या असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. काही भागांत सोयाबीनची बऱ्यापैकी परिस्थिती असूनही या सोयाबीनवरही शेतकऱ्यांना फवारणीसाठी मोठा खर्च करावा लागलेला असल्याने केलेल्या खर्चाएवढेही उत्पन्न मिळते की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. 

यंदा तरी चांगेल उत्त्पन्न मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आर्थिक तरतूद नसतानाही जमिनीच्या मशागतीसाठी खते, बी-बियाने खरेदीसाठी नातेवाईक, मित्रमंडळी, तर काहींनी कर्ज काढून पेरणी केली आहे. 
मागील काही वर्षांपासून परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीनच्या पेऱ्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. त्यामुळे साहजिकच अन्य पिकांच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचे प्रामुख्याने सोयाबीनच्या पिकावरच वर्षभराच्या खर्चाचे नियोजन अवलंबून आहे, मात्र यावर्षी पेरणी केलेल्या सोयाबीनची वाढ झालेली असली तरी पाच ते दहा शेंगांपेक्षा जास्त शेंगाच लागल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
नुकसान भरपाईची मागणी 
पावसाअभावी सोयाबीन करपले असून सोयाबीनचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी लाखनगाव (ता. वाशी) येथील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांना निवेदन देऊन केली होती. मात्र, अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पंचनामे झालेले नाहीत. 
 

मी पेरणी केलेल्या सोयाबीनची वाढ बऱ्यापैकी झालेली आहे. मात्र, ऐन शेंगा लागण्याच्या अवस्थेत पावसाने मोठी ओढ दिल्याने झाडांना अतिशय कमी शेंगा लागलेल्या आहेत. मजुरीचे दर वाढल्यामुळे सोयाबीन काढणीसाठी लागणारे पैसेही सोयाबीनच्या पिकातून मिळतील की नाही अशी अवस्था आहे. 
- सिद्धेश्वर सुकाळे, शेतकरी, सोनेगाव. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture News