आता कृषी पंपांना दिवसाही वीजपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

औरंगाबाद - कृषी पंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात वीस, तर जालना जिल्ह्यात नऊ ठिकाणी दोन ते दहा मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. 

औरंगाबाद - कृषी पंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात वीस, तर जालना जिल्ह्यात नऊ ठिकाणी दोन ते दहा मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. 

ही योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी महावितरणची अंमलबजावणी एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. योजनेसाठी राज्यातील २१८ तालुक्‍यांची निवड करण्यात आली असून, या प्रकल्पाची एकूण क्षमता एक हजार मेगावॉट क्षमतेची आहे. जिल्हानिहाय ५० मेगावॉट तर तालुकानिहाय दहा मेगावॉट अशी क्षमता निश्‍चित करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वीस गावांतील सोलर प्रकल्पांसाठी ४ कोटी ८९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून महिन्याला दोन लाख युनिटची वीजनिर्मिती होईल, अशी माहिती महावितरणाच्या सूत्रांनी दिली.

काय होईल फायदा? 
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील छोटे प्रकल्प हे महावितरणच्या २२ केव्ही किंवा ११ केव्ही क्षमतेच्या फिडरशी जोडण्यात येणार आहेत. यामुळे महावितरणच्या वितरण व्यवस्थेवरील भार कमी होऊन वीज हानी कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सौरऊर्जा प्रकल्पातून शेती पंपांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

येथे उभारणार प्रकल्प
औरंगाबाद जिल्हा - गाढेजळगाव, चौका, पाचोड, विहामांडवा, बालानगर, कातपूर, लिंबेजळगाव, लासूर, गंगापूर, सिद्धनाथ वडगाव, वाळूज, फुलंब्री, बाबरा, बाजार सावंगी, चिकलठाणा, देवगाव रंगारी, देवगाव बाजार, बनोटी, शिऊर, महालगाव.

जालना जिल्हा - पोल फॅक्‍टरी, नेर, सेवली, राजूर, हसनाबाद, वडीगोद्री, सौंदलगाव, राणीउंचेगाव, कुंभार पिंपळगाव, रांजणी.

Web Title: agriculture pump electricity supply