एकरी शंभर टन उसाचे उत्पादन शक्‍य! - पांडुरंग आवाड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुरूड - उसाचे उत्पादन वाढण्यासाठी त्याची जात महत्वाची नसून, व्यवस्थापन महत्वाचे आहे. योग्य व्यवस्थापनाद्वारे लागवड केल्यास एकरी शंभर टन उत्पादन मिळते, असा विश्‍वास रांजणीच्या (ता. कळंब) नॅचरल शुगर कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी व्यक्त केला.

मुरूड - उसाचे उत्पादन वाढण्यासाठी त्याची जात महत्वाची नसून, व्यवस्थापन महत्वाचे आहे. योग्य व्यवस्थापनाद्वारे लागवड केल्यास एकरी शंभर टन उत्पादन मिळते, असा विश्‍वास रांजणीच्या (ता. कळंब) नॅचरल शुगर कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी व्यक्त केला.

‘सकाळ ॲग्रोवन’ व इंडियन पोटॅश लिमिटेडच्या वतीने येथे बुधवारी (ता. २१) आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ‘ऊस लागवड व व्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. तालुका कृषी अधिकारी बाबासाहेब वीर, इंडियन पोटॅशचे जिल्हा प्रतिनिधी राहुल रत्नपारखी व गोरखनाथ पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. आवाड म्हणाले, ‘‘रुंद सरी, एक डोळा पद्धती, आडसाली ऊस लागवड, अनुभवी मार्गदर्शन व ठिबक सिंचन ही ऊस उत्पादन वाढीची पंचसूत्री आहे. पाण्याच्या तुटवडा होण्याच्या भीतीने शेतकरी सध्या ऊस लागवडीसाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. मात्र, पुढील वर्षात उसालाच चांगला पैसा मिळणार आहे. हमखास मिळणाऱ्या हमीभावामुळे उसाचे पीक हे शाश्वत आहे. 

निसर्गाच्या चक्रात अन्य पिकांचे नुकसान होते. मात्र, उसाचे पीक हाती लागते. यामुळे उसाकडे शेतकऱ्यांनी अभ्यासू वृत्तीने पाहण्याची गरज आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती केली पाहिजे.’’ श्री. वीर म्हणाले, ‘‘अशास्त्रीय पद्धतीने शेती केल्याने जमिनीचा पोत खराब झाला असून शेती थकून गेली आहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासोबत शेतकऱ्यांनी वृक्ष व पशुसंवर्धनासाठीही पुढे येण्याची गरज आहे. काटेकोर नियोजन व चांगल्या व्यवस्थापनातून शेती केल्यास शेतकऱ्यांना सरकारच्या अनुदानाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही.’’ या वेळी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष वैजनाथ नाडे, बिभीषण नाडे, राजेंद्र नाडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. ‘ॲग्रोवन’चे सिनिअर एक्‍झिकेटिव्ह बालाजी थोडसरे यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे बातमीदार विकास गाढवे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जितेंद्र बरकते यांनी पुढाकार घेतला. 

प्रयोगाशिवाय प्रगती नाही
शेतीत विविध प्रयोग केले तरच शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. पाटाने पाणी व दाट ऊस लागवड केल्यास उसाचे वजन वाढते, असा शेतकऱ्यांचा चुकीचा समज आहे. जमिनीचा वापसा झाल्याशिवाय पीक येत नाही, हे माहीत असतानाही शेतकरी ठिबक सिंचनासाठी पुढाकार घेत नाहीत. ठिबकमुळे उसाचे उत्पादन वाढून पहिल्याच वर्षात ठिबकचा खर्च निघून जात असल्याचे अनुभवाचे बोलही श्री. आवाड यांनी सांगितले.

Web Title: agrowon farmer communication event