फूट दाखविण्याची खेळी अन्‌ पावले आघाडीकडे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

बीड : आम्ही कोणासोबतही युती करणार नाही म्हणणाऱ्या एमआयएमची पावले आता 'काकू-नाना' आघाडीच्या तंबूकडे वळल्याचे दिसत आहे. नऊपैकी सात सदस्यांनी स्वतंत्र गट नोंदविला असला तरी ही फूट दाखविण्याची याच पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याची खेळी असल्याचे बोलले जाते.

बीड : आम्ही कोणासोबतही युती करणार नाही म्हणणाऱ्या एमआयएमची पावले आता 'काकू-नाना' आघाडीच्या तंबूकडे वळल्याचे दिसत आहे. नऊपैकी सात सदस्यांनी स्वतंत्र गट नोंदविला असला तरी ही फूट दाखविण्याची याच पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याची खेळी असल्याचे बोलले जाते.

पालिका निवडणुकीत एमआयएमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेख निझाम अटीतटीच्या लढतीत दुसऱ्या स्थानापर्यंत पोचले. पहिलीच निवडणूक असताना पक्षाचे नऊ नगरसेवक विजयी झाले. आम्ही कोणासोबतही युती करणार नाही, विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असे पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले; मात्र नऊपैकी सात नगरसेवकांनी स्वतंत्र गटाची नोंदणी केली आहे. वरकरणी ही पक्षातील फूट वाटत असली तरी पक्षाच्याच एका ज्येष्ठ नेत्याची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे आहे. पुढच्या दहा दिवसांत उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरण्याची शक्‍यता आहे. कोणाकडेही बहुमत नसल्याने उपाध्यक्ष निवडीत एमआयएमची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे एमआएमच्या सात सदस्यांचा गट करून तो आघाडीच्या तंबूत पाठविण्याची खेळी सुरू आहे. सात जणांचा गट नोंदविल्यामुळे त्यांना एक स्वीकृत सदस्यपदही मिळणार आहे. शेख सुलताना शेख बेगम शेख चांद गटनेता असलेल्या या सात जणांच्या गटात त्यांच्यासह शेख जफर सुलताना बशीर, शेख मोहम्मद खालेद, अहमद नसिफा खातून अहमद, मोमीन अझरोद्दीन नैमोद्दीन, रुखिया बेगम बशिरोद्दीन, शेख बिस्मिल्ला पाशामियॉं यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या खेळीकडे लक्ष 
पालिका राजकारणात माहीर समजल्या जाणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या काही खेळ्या अयशस्वी झाल्या; मात्र सर्वच पातळ्यांवर विरोध होऊनही नगराध्यक्षपदी विजयी होण्याचा डाव त्यांनी साधला. बहुतांशी अधिकार नगराध्यक्षांना असले तरी कारभार सुरळीत चालविण्यासाठी उपाध्यक्षपद असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे डॉ. क्षीरसागर काय खेळी करतात याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: AIMIM looking for tie-ups in local body elections at Beed