बंद विमानसेवेने महागला विमानप्रवास 

प्रकाश बनकर
सोमवार, 20 मे 2019

औरंगाबाद : शिर्डी येथे विमानतळ सुरू झाल्याचा सर्वाधिक फटका हा औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला आहे. देशभरातून शिर्डीच्या दर्शनाला विमानाने येणाऱ्यांना आता थेट शिर्डीपर्यंत सेवा मिळाल्यामुळे औरंगाबादच्या विमानतळास प्रवाशाबरोबर विमान कंपन्यांही बायपास मारत आहेत. 

औरंगाबाद : शिर्डी येथे विमानतळ सुरू झाल्याचा सर्वाधिक फटका हा औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला आहे. देशभरातून शिर्डीच्या दर्शनाला विमानाने येणाऱ्यांना आता थेट शिर्डीपर्यंत सेवा मिळाल्यामुळे औरंगाबादच्या विमानतळास प्रवाशाबरोबर विमान कंपन्यांही बायपास मारत आहेत. 

यात जेटची विमानसेवा बंद झाल्यामुळे दिल्ली-औरंगाबादच्या विमानप्रवासाचे तिकीट महाग आणि दिल्ली-शिर्डीचे तिकीट स्वस्त झाले आहे. याचा अनुभव अनेकांना येत आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेवा, सुविधा असतानाही नव्या विमान कंपन्या या विमानतळाकडे पाठ फिरवत आहेत. औरंगाबाद शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे चिकलठाणा विमानतळावर नाईट पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. सर्व अत्याधुनिक सुविधा असताना कंपन्यांचा ना-ना सुरू आहे. याच्या उलट स्थिती शिर्डी विमानतळावर बघायला मिळत आहे. शिर्डी येथील विमानतळ सुरू होऊन काही महिने झाले आहेत. तेथे दहा ते अकरा विविध विमान कंपन्या देशभरातून सेवा देऊ लागल्या आहेत. कंपन्या जास्त असल्यामुळे तिकिटाचे दर हे आवाक्‍यात आहेत. दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या प्रवाशाला सहा ते साडेसहा हजार रुपयांत तिकीट मिळत आहे. तेच औरंगाबादच्या येणाऱ्यासाठी पंधरा ते 19 हजार रुपये मोजावे लागतात. तिकिटाचे दर प्रत्येक वेळी वेगवेगळे असले तरी औरंगाबादपेक्षा शिर्डीचे दर कमीच आहेत. शिर्डीच्या विमानतळावर चिकलठाणा विमानतळापेक्षा कमी सुविधा आहेत. तरीही 11 एअरलाइन्स कंपन्या आहेत. चिकलठाणा विमानतळावर सर्व सुविधा असताना केवळ दोन एअरलाइन्सच्या सेवा आहेत. 

शहरवासीयांनी शोधला पर्याय 
औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावरून दिल्ली आणि मुंबईसाठी एकच सेवा असल्यामुळे नागरिक आता शिर्डी विमानतळावरून देशभरातील उड्डाण घेणाऱ्या विमानसेवेचा लाभ घेत आहेत. औरंगाबादेतून वाहनाने शिर्डी गाठतात. तेथे साईचे दर्शन घेत तेथून विमानाने प्रवास करीत आहेत. चिकलठाणा विमानतळावर राजकीय उदासीनतेमुळे विमानसेवा येत नसल्यामुळे शहरवासीयांनी हा पर्याय शोधला आहे. 

मी दिल्लीहून औरंगाबादला एका कार्यक्रमासाठी येत होतो. मला दिल्ली-औरंगाबादच्या विमानसेवेसाठी 19 हजार रुपये तिकीट सांगितले. ते रद्द करून मी दिल्ली ते शिर्डी असा विमानप्रवास केला. यासाठी मला केवळ साडेसहा हजार रुपये लागले. तेथे दर्शन घेऊन मी औरंगाबादेत आलो. 
- प्रियांक आर्य, प्रवासी तथा अधिकारी, डाबर इंडिया कंपनी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: airplane travel expense increase due to close down of service