विमानतळावरील नाल्यांचा प्रश्‍न सुटणार

प्रकाश बनकर
रविवार, 9 एप्रिल 2017

औरंगाबाद - चिकलठाणा विमातनळाच्या धावपट्टीवरून वाहणाऱ्या तीन धोकादायक नाल्यांचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. या नाल्यांना भूमिगत करण्याच्या प्रस्तावाला विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयातर्फे हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे आता लवकरच हे नाले भूमिगत होणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'ला दिली. "सकाळ'ने या प्रश्‍नी वेळावेळी पाठपुरावा करीत विमानतळ प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी, पायलट कॉलनीसह इतर भागांतून येणारे नाले थेट चिकलठाणा विमानळाच्या धावपट्टीजवळून वाहतात. या नाल्यामुळे धावपट्टीवर पक्षी आणि मोकाट जनावरांचा संचार वाढला आहे. त्यामुळे विमानांना टेकऑफ आणि लॅंडिंगसाठी अडचणी निर्माण होतात. या विषयी तत्कालीन विमानतळ निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी नाले भूमिगत करण्याविषयी हालचाली केल्या होत्या. त्या संदर्भात विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयास त्यांनी आठ कोटी रुपयांचा प्रस्तावही पाठविला होता. तसेच महापालिकेला हे नाले दुसऱ्या बाजूने वळविण्याची विनंती केली होती.

विमानतळाबाहेरील नाले महापालिकेने अंडरग्राउंड केले होते; मात्र विमानतळामधील नाले तसेच सोडून दिले होते. आतील नालेही महापालिकेने भूमिगत करावेत, अशी मागणी केली होती. याउलट महापालिकेने या प्रश्‍नी हात वर केले होते. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाने 2016 मध्ये मुख्य कार्यालयास प्रस्ताव पाठविला होता. जबलपूरला एका विमानाचा अशा नाल्यामुळेच अपघात झाला होता. त्यामुळे दक्षता म्हणून आलोक वार्ष्णेय यांनी हा प्रस्ताव पाठविला होता. मुख्य कार्यालयाने हा प्रस्ताव मान्य केला आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ऑन दी स्पॉट रिपोर्ट
विमानतळावरील धावपट्टीच्या 714 मीटरच्या तीन नाल्यांचा मुद्दा "सकाळ'ने 4 जानेवारी 2016ला "ऑन दी स्पॉट रिपोर्ट'च्या माध्यमातून उपस्थित केला होता. हा रिपोर्ट तत्कालीन विमानतळ निर्देशक अलोक वार्ष्णेय यांनी मुख्य कार्यालयास पाठविला. सततच्या पाठपुराव्याने हा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

Web Title: airport dranage issue