दोन हजार वर्षे टिकेल ‘अजिंठा’

Ajintha
Ajintha

औरंगाबाद - हवामानातील बदलांचा परिणाम होऊन अजिंठा लेणी हळूहळू नामशेष होत जाईल, हे भाकीत खोटे ठरवण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. लेणीतील भग्नावशेषांना पूर्वरूप देण्यासाठी गेली १० वर्षे नव्या शास्त्रीय पद्धतींनी अखंड काम सुरू आहे. संवर्धनाच्या या पद्धतीने अजिंठा लेणी पुढील दोनशेच काय, तर दोन हजार वर्षे टिकू शकेल, असा पुरातत्त्वज्ञांना विश्‍वास आहे.

शिकारीसाठी वाघाच्या मागावर असलेला मद्रास रेजिमेंटचा ब्रिटिश सैन्याधिकारी जॉन स्मिथ याला वाघूर नदीच्या खोऱ्यात अजिंठा लेणी दिसली. भग्न आणि दुरावस्थेत असणाऱ्या लेणीत त्याने २८ एप्रिल १८१९ अशी तारीख कोरून ठेवली. या घटनेला रविवारी (ता. २८) २०० वर्षे पूर्ण होत आहेत. जगाच्या नकाशावर आलेली ही लेणी त्यानंतर मात्र जगभरातील अभ्यासक आणि पर्यटकांचे सतत आकर्षण राहिली. तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन याने अजिंठ्याच्या लेण्यांचे आणि चित्रांचे संवर्धन करण्याचे आदेश दिले होते. 

एम. एन. देशपांडे यांचे योगदान
निजामाच्या पुरातत्त्व विभागाने सिकोनी नावाच्या इटालियन संवर्धनतज्ज्ञाकरवी अजिंठ्यात संवर्धनाचे काम केले. स्वातंत्र्योत्तर काळात वर्ष १९५२ मध्ये ही लेणी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अखत्यारीत आली. अफगाणिस्तानातील बामियानच्या बुद्धमूर्तींचे संवर्धन करणारे तत्कालीन संचालक मधुसूदन नरहर ऊर्फ एम. एन. देशपांडे, संवर्धन संचालक डॉ. आर. सेनगुप्ता या जोडगोळीने अजिंठ्यात अद्वितीय काम करून ठेवले. त्यांच्यामुळेच आज अजिंठा आपल्याला चांगल्या स्थितीत पाहायला मिळते. तेव्हापासून अनेक पुरातत्त्वज्ञांचा या कामी हातभार लागला आहे. 

जीएसआय सर्व्हे ठरला मैलाचा दगड
जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने अजिंठा आणि परिसराचा व्यवस्थित भूगर्भशास्त्रीय अभ्यास करण्यात आला. लेणीचा दगड कुठे कमकुवत झाला आहे, कुठे चांगला आहे, कुठे पाणी मुरत आहे, हे सगळे शोधून काढले. हा वैज्ञानिक अहवाल आल्यानंतर लेणीच्या संवर्धनाच्या कामाला निश्‍चित दिशा मिळाली.

गिरणा नदीपात्रातून दगड आणून घडवलेले खांब
निजामकाळात लेणीतील भग्न खांबांच्या जागी दगडांचे चिरे उभारून छताला आधार देण्यात आला होता. स्वातंत्र्योत्तर काळात चैत्याच्या भग्न खांबांची जागा चुन्याच्या बांधकामातून उभारलेल्या खांबांनी घेतली. कालांतराने तेही जीर्ण होऊ लागल्यामुळे ते सगळे काढून, त्या ठिकाणी जसेच्या तसे दगडी खांब उभारण्याची कल्पना पुढे आली. गिरणेच्या पात्रातून एकेक घनमीटर आकाराचा दगड काढून, महत्प्रयासाने लेणीत आणून मूळ खांबांच्या आकारात घडविण्यात आला.

पडद्यामागील नायक
पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद मंडळाच्या वेळोवेळी आलेल्या अधीक्षकांच्या नेतृत्वात अजिंठा लेणीच्या जतन, संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या कामात गेल्या तीसेक वर्षांत अनेक सुधारणा झाल्या. पण या सर्व कामांमध्ये पडद्यामागील नायक म्हणून संरक्षण सहायक प्रकाश देशमुख आणि ज्ञानेश्‍वर दानवे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. लेणीत झिरपणारे पाणी रोखणे, झिजलेल्या खांबांचे संवर्धन अशी अनेक कामे देशमुख यांनी १९७७ पासून २०१०पर्यंत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com