रस्त्याच्या दुरवस्थेने अजिंठाचे पर्यटक घटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

ऐतिहासिक वारसास्थळामुळे औरंगाबादची जगभर ख्याती, मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे जगभर नाचक्‍की अशी स्थिती आहे. अजिंठा लेणी पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांमध्ये औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ९० टक्‍के घट झाली. अजिंठ्यास दिवसाला तीन हजारांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दीडशेपर्यंत घटली. व्यवसायही घटला. जिल्ह्यातील ४७३ किलोमीटरच्या प्रमुख महामार्गांची वाट लागली. मराठवाड्यात रस्त्यांच्या दुरवस्थेचे भले मोठे संकट आहे.

ऐतिहासिक वारसास्थळामुळे औरंगाबादची जगभर ख्याती, मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे जगभर नाचक्‍की अशी स्थिती आहे. अजिंठा लेणी पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांमध्ये औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ९० टक्‍के घट झाली. अजिंठ्यास दिवसाला तीन हजारांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दीडशेपर्यंत घटली. व्यवसायही घटला. जिल्ह्यातील ४७३ किलोमीटरच्या प्रमुख महामार्गांची वाट लागली. मराठवाड्यात रस्त्यांच्या दुरवस्थेचे भले मोठे संकट आहे.

औरंगाबाद-जळगाव १५० किलोमीटर महामार्गाचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. रस्ता खोदलाय. त्याची झळ औरंगाबाद ते अजिंठा या मार्गावरील गावांना बसली आहे. शेतमाल विक्रीसाठी नेणे खडतर बनलंय. जिल्ह्यात सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग दीडशे किलोमीटरचा आहे. त्याचे काम सुरू आहे. औरंगाबाद-वैजापूर ७८ किलोमीटर रस्त्याचीही पूर्ण वाट लागली. परिणामी, वैजापूरमधून औरंगाबादमध्ये येणाऱ्या कांद्यावर संकट आहे. औरंगाबाद बाजार समितीतील महसुलावर ८० टक्के परिणाम झालाय. औरंगाबाद-शिर्डी या ८०, तर कन्नड-सिल्लोड या ६० किलोमीटर रस्त्यांचीही दुरवस्था आहे.

आंतरराज्य वाहतुकीत अडथळे
नांदेड - जिल्ह्यातील सहा राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. पुलांसाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली, तरीही परतीच्या पावसाने त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतुकीस अडथळे येताहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख राज्य मार्गांसह जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ६४५ किलोमीटर रस्त्यांची अतिवृष्टीने दयनीय अवस्था झाली आहे. खडी, डांबर उखडल्याने आणि खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे एसटीसह खासगी वाहनांच्या नुकसानीत वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या एक हजारवर किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती आवश्‍यक आहे. शहरातील रस्त्यांवरील खडी, डांबर उखडल्याने ते खड्डेमय झालेत.

ना सर्वेक्षण, ना प्रस्ताव
लातूर - परतीच्या आणि अवकाळी पावसाने शहराप्रमाणे ग्रामीण रस्त्यांची वाट लागली. ग्रामीण ५ हजार १२६ किलोमीटरपैकी बहुतांश रस्ते खराब झालेत. अशा रस्त्यांचे अद्याप सर्वेक्षण झालेले नाही. की निधीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवले नाहीत. शहरातल्या मुख्य रस्त्यांना मोठे खड्डे पडलेत. खड्डे हॉटमिक्‍सने दुरुस्त करावेत, अशा सूचना माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी दिल्या होत्या. महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. मुरूमाने दुरुस्ती केल्याने त्यांची पुन्हा दुरवस्था झाली. लातूर-उदगीर मार्ग खड्डेमय झाल्याने सव्वा तासाऐवजी दोन तास लागतात. 

रस्ते बनलेत अनोळखी
उस्मानाबाद - तीन वर्षांपासून दुरुस्ती, खड्डे बुजवण्याची मोहीम संथ राबवल्याने रस्ते अनोळखी झालेत. जिल्हा परिषदेच्या चार हजार ८७८ किलोमीटर लांबीपैकी दोन टक्के रस्त्यांची दुरुस्ती झाल्याने त्याचा दर्जा खालावलाय. रस्ते खड्डेमय झालेत. परिणामी, ग्रामीण भागात एसटीची वाहतूक थांबली. अनेक रस्ते पाण्याखाली होते. एसटीच्या भूम आगाराला खराब रस्त्यांमुळे दरमहा अडीच लाखांचा भुर्दंड सोसावा लागतोय. बांधकाम विभागाच्या दोन हजार किलोमीटरपैकी दहा टक्केच रस्त्यांची दुरुस्ती दरवर्षी होते आहे.

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा
बीड - धुळे-सोलापूर, कल्याण-विशाखापट्टणम या दोन राष्ट्रीय महामार्गासह नगर-अहमदपूर, बीड-परळी, परळी-अंबाजोगाई हे जिल्ह्यातून जाणारे प्रमुख राज्यमार्ग. धुळे-सोलापूर वगळता इतर मार्ग मृत्यूचे सापळे बनलेत. २०१८ मध्ये अपघातात ३१३ जणांनी जीव गमावला. यंदा आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला. धुळे-सोलापूर व नगर-अहमदपूर हा रस्ता बांधणीसाठी उखडून ठेवलाय. परळी-अंबाजोगाई हा रस्ता उखडलेला आहे. धारूरच्या अरुंद घाटामुळे अपघातांचे प्रमाण वाढलंय.

हिंगोलीत शंभर जणांचा मृत्यू 
हिंगोली - मागील सहा महिन्यांत जिल्ह्यात अडीचशे अपघात झाले, शंभर जणांना प्राण गमवावे लागले. साडेतीनशे जायबंदी झाले. अकोला-नांदेड, रिसोड-सेनगाव, हिंगोली-परभणी, हिंगोली-वसमत, वसमत-परभणी इत्यादी मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केलेत. नवीन रस्ते केल्यानंतर साइडपट्टी न भरल्याने रस्त्याखाली गेलेली वाहने रस्त्यावर आणताना अपघात होताहेत. पाठदुखी आणि मणक्‍याच्या विकाराचे रुग्ण खराब रस्त्यांमुळे वाढल्याचे डॉक्‍टर सांगतात, तर एसटीच्या अनेक बस नादुरुस्त झाल्या आहेत.

गाडीचा पट्टा तुटला, शॉकॲब्सॉर्बर खराब झाले, अशा प्रकारची वाहने दुरुस्तीसाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या कायम राहिल्यास खासगी वाहनांच्या वापराचे प्रमाण कमी होईल. त्याचा सर्व अवलंबितांना आर्थिक त्रास होऊ शकतो. 
- बप्पा घोडके, मेकॅनिक, उस्मानाबाद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajintha tourist less by road condition bad