ट्रक अपघातामुळे अजिंठा घाट सात तास जाम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

वाकोद/तोंडापूर (ता. जामनेर) - अजिंठा घाटातील दर्गाहजवळ उभ्या नादुरुस्त ट्रकला समोरून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले. या अपघातामुळे तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती. हाकेच्या अंतरावरील अजिंठा पोलिस घटनास्थळी दोन तास उशिरा पोहोचले. तर पाच तासांनंतर जळगावहून क्रेन आली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

वाकोद/तोंडापूर (ता. जामनेर) - अजिंठा घाटातील दर्गाहजवळ उभ्या नादुरुस्त ट्रकला समोरून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले. या अपघातामुळे तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती. हाकेच्या अंतरावरील अजिंठा पोलिस घटनास्थळी दोन तास उशिरा पोहोचले. तर पाच तासांनंतर जळगावहून क्रेन आली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

ट्रक (जीजे-19, यु-3452) हा मका भरून भुसावळहून पुणे येथे जात होता. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास तो अजिंठा घाटात आला असता स्टेरिंग जाम झाले. त्यामुळे तो भररस्त्यावर उभा होता. दरम्यान औरंगाबादकडून जळगावकडे चिंच भरून येणाऱ्या ट्रकला (एमएच-28, बी-8055) समोरून येणाऱ्या ट्रकने हूल दिली. यामुळे चिंचाने भरलेला ट्रक उभ्या असलेल्या ट्रकवर धडकला. यात ट्रकमधील रवीभाई (वय 45, रा. गुजरात), प्रताप अर्जुन (वय 35, रा. गुजरात) जखमी झाले. त्यांना अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथे हलविले.

अपघातामुळे अजिंठाकडील वाहने सोयगाव मार्गे हळदा, उंडणगाव, गोलेगाव मार्गे औरंगाबाद व जळगाव, भुसावळकडे पाठविण्यात आली. जळगाव, भुसावळ, औरंगाबाद हा राज्य महामार्ग तब्बल 7 तास ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. उशिरा माहिती मिळाल्याने अजिंठा पोलिस सकाळी साडेसातला, तर वाहतूक पोलिस दहाला घटनास्थळी पोहोचले. सिल्लोड तालुक्‍यातून क्रेन उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी जळगाव येथून मागविले. यानंतर दोन तास प्रयत्न करून दोन्ही ट्रक बाजूला काढण्यात आले. साडेअकराच्या सुमारास ट्रक बाजूला करताच दोन्हीकडील वाहनधारकांनी एकच घाई केल्याने पुन्हा तासभर वाहतूक ठप्प झाली होती. यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

अडकल्या 25 बस
जळगाव - अजिंठा घाटात अपघातामुळे जळगाव जिल्ह्यातून औरंगाबाद, पुणेकडे जाणाऱ्या आणि जळगावकडे येणाऱ्या साधारण 25 बस अडकल्याचे जळगाव विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले. महामार्गावर वाहतूक खोळंबल्याने मार्ग बदलविणेदेखील शक्‍य नव्हते. परिणामी बसमधील प्रवाशांना तेथेच थांबून राहावे लागले.

अपघाताबाबत महामंडळाच्या जळगाव विभागीय कार्यालयास माहिती मिळाल्यानंतर तत्काळ लाईन चेकिंगच्या गाडीतून पर्यवेक्षक व काही अधिकाऱ्यांना पाठवून पहूर-फर्दापूर येथून कंट्रोलिंग करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी दिली. औरंगाबाद, पुणेकडे जाणाऱ्या बस सोयगावमार्गे घाटनांद्रा घाटातून वळविण्यात आल्या. यात प्रामुख्याने जळगाव आगारातील पाच, यावलच्या सहा, जामनेरच्या सहा, मुक्ताईनगर येथील एक आणि भुसावळ आगारातील सहा, तसेच औरंगाबादहून जळगावकडे येणाऱ्या पाच बस यात अडकल्या होत्या.

Web Title: ajintha vally traffic jam by truck accident