मुंबईच्या तिजोरीवर डोळा, म्हणून युती तुटली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

जालना - ""पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर डोळा असल्यामुळेच शिवसेना- भाजपची 25 वर्षांची युती तुटली,'' असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जालना जिल्ह्यातील तीर्थपुरीच्या सभेत बोलताना केला. युती तोडण्यासाठी यांना पंचवीस वर्षं लागली, "लई लामची दूरदृष्टी आहे यांची' अशा शब्दांत त्यांनी शिवसेना- भाजपवर तोंडसुख घेतले. 

""अडीच- तीन वर्षांपासून राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आहे; पण शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने त्यांना उभे केले होते; पण हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करणारे आहे. आता केंद्र सरकार आणखी एक शेतकरीविरोधी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. परदेशातून साखर आयात केली जाणार आहे, असे झाले तर शेतकऱ्यांचे वाटोळे होईल. तूर, कापूस आदी शेतमालाला आधीच भाव नाही, त्यात असे निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर उठतील,'' असा इशारा अजित पवारांनी या वेळी दिला. 

""राज्यात बहुजन समाजाची आज काय अवस्था आहे? सरकार आरक्षण द्यायला तयार नाही, इतर आरक्षणाला धक्का न लावता बहुजन समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे; पण सत्तेत असलेल्या शिवसेनेला आरक्षण मान्य नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे शेती नाही तरी ते शेतीवर भाषणे ठोकतात. कोण कुणाला कौरव, पांडव, शकुनीमामा, दुर्योधन म्हणतात; पण यातून राज्याचे प्रश्‍न सुटणार आहेत का? गुंडांचा पक्ष, औकात अशी भाषा राज्यकर्त्यांना शोभत नाही, याने लोकांचं भलं होणार आहे का?'' असा सवाल देखील अजित पवारांनी केला. 

आश्‍वासनांचे सरकार 
""निवडणुकीच्या काळात सरकारकडून फक्त आश्‍वासने दिली जातात. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून झीरो टक्के व्याजदराने कर्ज देऊ असे सांगतात. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय का घेतला जात नाही? नोटांबदीचा निर्णय घेतला, यामुळे पन्नास हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या. खरेदी- विक्रीचे व्यवसाय ठप्प झाले. जादूची कांडी फिरवल्याचा आव आणला गेला; पण नोटाबंदीने राज्याचे नुकसान व जनतेचा भ्रमनिरास झाला आहे,'' अशी टीका त्यांनी केली. देशाला व राज्याला मागे नेणाऱ्यांना बदलण्याची वेळ आली असल्याचे पवार म्हणाले.

Web Title: ajit pawar meeting in jalna