भ्रष्टतेला दूर सारून निकोप वाङ्‌मयीन चळवळ उभी रहावी : अरुणा ढेरे 

Osmanabad News
Osmanabad News

उस्मानाबाद : पाण्याची टंचाई सोसूनदेखील सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलन होत आहे. छोट्या छोट्या शहरांतील मंडळींनी आश्वासक लिहिले आहे. लहान लहान गावांतील तरुण कसदार लिहू पाहत आहे, त्यांना सुजाण वाचकांचे पाठबळ गरजेचे आहे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी केले. 

अरुणा ढेरे म्हणाल्या, "गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी महामंडळाने अध्यक्षांची निवड एकमताने केली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे अध्यक्ष होणे फार आनंदाची गोष्ट आहे. मात्र परभाषक साहित्यिकाला आमंत्रित न करण्याच्या महामंडळाच्या निर्णयानंतर भारतीय भाषा मंडळाशी स्नेहसंवाद करण्याची एक वाट बंद झाली आहे, अशी माझी व्यक्तिगत भावना आहे. महाश्वेता देवी ते गिरीश कर्नाड यांच्यापर्यंत ही परंपरा चालत आलेली होती. महानोर यांच्यासारखे ज्येष्ठ मराठी कवी उद्घाटनाला आल्याचा आनंद मोठा असला, तरी भारतीय भाषांशी मैत्री जोडण्याची परंपरा खंडित केलेली आहे.'' 

"देश आणि धर्म वेगळा असला, तसेच मातृभाषा ही वेगळी असली तरी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीवर प्रेम करणारे अनेक लोक मराठी मातीत मध्ययुगापासून नांदली आहेत. त्यांच्याबाबत मतांतरे नव्हती असे नाही; पण निरोगी, निकोप वाङ्‌मयासाठी ते आवश्‍यक आहे. शेवटी सच्चा ज्ञानव्यवहार सगळ्या भेदांच्या पलीकडे जाणारा असतो. हे लक्षात घेतले पाहिजे. सत्संग, बुद्धीगांभीर्याने काम करणारा कोणतेही साहित्यकार किंवा कलावंत हा जात, धर्म, द्वेष, वंश यांच्या पलीकडेच जाणारा असतो. हे आपल्याला विसरून चालणार नाही,'' असे मत अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

"आज विशिष्ट विचारांनी भारलेल्या संघटनांनी निर्माण केलेल्या संभ्रमाला शरण जाणे हे जसे खेदकारक आहे, तसेच शहाण्या, जाणत्या, सुसंस्कृत अशा वाङ्‌मयप्रेमींचा विचार न करता या ना त्या गोष्टीने संमेलनाच्या संदर्भात निर्माण केलेल्या अराजक सदृश्‍य परिस्थितीला दरवेळी सामोरे जाणे हे देखील खेदकारक आहे,'' असेही त्या म्हणाल्या. 

"हे किंवा ते झेंडे खांद्यावर घेणे म्हणजेच आपण विचारी आहोत असे सिद्ध करणे नाही. हा खरा विवेकी बुद्धीवाद नव्हे. संवादशक्ती आणि आत्मशक्ती गमावलेला भयभीत समाज ही आपली खरी ओळख नाही. कोणतीही संस्कृती आरोळी देणाऱ्याच्या, धाक दाखवणाऱ्याच्या, धमक्‍या देणाऱ्याच्या आक्रमतेवर तरत नाही. साध्या, सामान्य माणसांच्या सत्वशील कृत्यांवर आणि ज्ञानवंतांच्या सशक्त विचारांवर तरलेली असते. साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात हाच अनुभव पुन्हा पुन्हा येईल, याची खात्री आपण स्वतःला दिली पाहिजे,'' अशी भूमिका अरुणा ढेरे यांनी मांडली. 

"भ्रष्ट काळाचे प्रतिनिधी म्हणून उद्याच्या जगाने आपल्याला ओळखू नये, असे जर आपल्याला वाटत असेल तर तर मग आपला आंतरिक आवाज ऐकणारे आणि नव्या पिढीवर विश्वास टाकणारे लेखक आणि वाचक म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात राहू या,'' असे आवाहन त्यांनी केले. 

बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांना 
राज्य सरकारने आर्थिक पाठबळ द्यावे 

गेल्या वर्षीच्या संमेलनात जे ठराव केले, त्यापैकी दोन ठरावांचा पाठपुरावा करायचे मी ठरवले आहे. ग्रंथालय सेवकांची वेतन वाढ आणि बृहन्महाराष्ट्रात मराठीसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना कायमस्वरुपी आर्थिक पाठबळ राज्य सरकारने द्यावे, असे हे ठराव आहेत. ग्रंथालय सेवकांच्या वेतनवाढीचा प्रश्न अजून विचारधीन आहे, असे समजले. मराठीच्या प्रेमासाठी, आपली कला संस्कृती जपण्यासाठी पर राज्यात मराठी संस्था मनापासून कार्यरत असतात. त्यांना आर्थिक पाठबळ राज्य सरकारने द्यावे, असा आग्रह मी धरला. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी पत्र पाठवले. त्यामध्ये त्यावर कार्यवाही सुरु केल्याचे सूचित केले. नव्या सरकारमध्ये हा निर्णय अंमलात येईल, अशी मला खात्री आहे, असे अरुणा ढेरे म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com