Video : सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांची धमाल 

Osmanabad News
Osmanabad News

संत गोरोबाकाका साहित्यनगरी, उस्मानाबाद : महाराष्ट्राची सांस्कृतिक कला सादर करीत शालेय विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात दोन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवले. शेतकरी, बंजारा, आदिवासी, अंबिका, धनगरी गीतांबरोबरच कव्वाली, नाटिका सादर करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. 11) सकाळी शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सेतु माधवराव पगडी साहित्य मंचावर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्याच्या विविध भागांतील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी कला सादर केली. यामध्ये संहिता शितोळे हिने गणेश स्तवन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. चिलवडी (ता. उस्मानाबाद) येथील प्राथमिक शाळेने शेतकरी गीत सादर केले. त्यातून राज्यकर्ते, प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेकडे कसे दुर्लक्ष केले जाते, याचे वर्णन या गीतांमधून विद्यार्थी व विद्यार्थिंनी केले. 

ईडा पिडो टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, अशी आर्त हाक विद्यार्थ्यांनी दिली. सर्वसामान्यांना विचार करायला लावणाऱ्या या गीताला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. दुष्काळी परिस्थितीत जगणारा शेतकरीही शेतीला पिकवू, मुलीला शिकवू, हा आत्मविश्वास घेऊन धडपड करीत असल्याचे चित्र या गीतामधून विद्यार्थ्यांनी मांडले. साऱ्या देशाचे पोट ह्यो भरतोय तर राबराबून शेतकरी मरतोय, हे सांगण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला. 

वाशी येथील बालसंस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धनगरी गीत सादर केले. जवळा (नि., ता. परंडा) येथील विद्यार्थी व विद्यार्थिंनी संतांची परंपरा सादर केली. माऊली, माऊली... या गितावर या विद्यार्थ्यांनी नृत्य केले, तर याच शाळेच्या विद्यार्थिंनींनी कव्वालीही सादर केली. रामतीर्थ (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिंनीनी बंजारा गीतांवर नृत्य सादर केले. येडशी (ता. उस्मानाबाद) येथील रामलिंगनगरच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतावर नृत्य सादर करीत धमाल केली. 

गंधोरा (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्योतिबाच्या नावानं चांगभलं या गीतावर नृत्य सादर करीत शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे, अशी प्रार्थना केली. वडगाव (सिद्धेश्वर, ता. उस्मानाबाद) येथील गौतमी मस्के हिने लावणी गीतावर नृत्य सादर केले. ईट (ता. भूम) येथील जिल्हा परिषद प्रशालेतील मृण्मयी कवडे हिने मी जिजाऊ बोलते ही नाटिका सादर केली. सध्या मुली, महिलांवर होणारा अत्याचार, त्याबद्दल पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास होत असलेली दिरंगाई, या विषयावर रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिंनीनी नाटिका सादर केली. 

या सांस्कृतिक कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. विशाल सूर्यवंशी व अनुराधा देवळे यांनी सूत्रसंचालन केले. 

कार्यक्रमासाठी शिवाजी चव्हाण, विजय माने, प्रवीण गाडे, संतोष मुळे, प्रशांत माने, पवन सूर्यवंशी, ज्ञानेश ढोले, नागेश ढगे, संजय गुरव, ज्ञानेश बनकर, दिलीप चौधरी, प्रवीण शितोळे यांनी पुढाकार घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com