धर्मावरून भेदभाव हे अमानुषपणाचे लक्षण : संमेलनाध्यक्ष दिब्रिटो

सुशांत सांगवे
Friday, 10 January 2020

मी साहित्याच्या मंदिरातील एक छोटा सेवक आहे, शेवटच्या पायरीवर बसून दिवे लावणारा. माझ्या कार्याची दखल घेऊन अनपेक्षितपणे मला संमेलनाध्यक्ष पदाचा सन्मान देण्यात आला. मग मी धमक्‍यांना का भिऊ?

संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : धर्म, जात, पंथ यावरून भेदभाव करणे अमानुषपणाचे लक्षण आहे. पण, सध्या हे घडत आहे. विद्यार्थ्यांची लाठ्या-काठ्यांनी डोकी फोडली जात आहेत. विचारवंत-सामाजिक कार्यकर्त्यांचे खून केले जात आहेत. हे सगळे कुठल्या संस्कृतीत, कुठल्या धर्मात बसते? अशी संस्कृती आम्हाला शिकवू नका. हे मोठ्याने सांगण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी खडे बोल सुनावले. एकमेकांत भिंती उभारण्यापेक्षा पूल बांधुया. नैतिकतेच्या वनराया उभ्या करूया, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि मराठवाडा साहित्य परिषद (उस्मानाबाद शाखा) यांच्या वतीने आयोजित 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन कविवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी दिब्रिटो यांना संमेलनाध्यक्षपदाची सूत्र प्रदान केली. यावेळी आपले लिखित भाषण बाजूला ठेऊन दिब्रिटो यांनी विविध विषयांवर मुक्त संवाद साधला.

Image may contain: 11 people, people smiling, people standing

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, अक्षयकुमार काळे, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष विद्या देवधर, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, दादा गोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी

दिब्रिटो म्हणाले, ''मी हरित वसईसाठी गुंडाविरोधात लढा दिला.त्याचवेळी भीती मला सोडून गेली होती. खरतर मी साहित्याच्या मंदिरातील एक छोटा सेवक आहे, शेवटच्या पायरीवर बसून दिवे लावणारा. माझ्या कार्याची दखल घेऊन अनपेक्षितपणे मला संमेलनाध्यक्ष पदाचा सन्मान देण्यात आला. मग मी धमक्‍यांना का भिऊ? सगळे माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा मी शाळेतच शिकलो आहे. त्यामुळे मला कोणाचा विरोध करायचा नाही. पण नैतिक भूमिका घेऊन उभे राहिले पाहिजे. प्रत्येक लेखकाने, नागरिकाने ही भूमिका घेतली पाहिजे. स्पष्ट बोलले पाहिजे. मी आजवर बोलत, भूमिका घेत आलो आहे.''

Image may contain: 1 person, standing and indoor

वसई एक आदर्श प्रयोगशाळा 

''मला नेहमी वाटते, वसई ही एक आदर्श प्रयोगशाळा आहे. इथे सर्व धर्म समभावाचे वातावरण आहे. ख्रिशन लोक आहेत. मुस्लिम आहेत आणि ब्राह्मणही. हा प्रयोग सगळीकडे आदर्श मानला गेला पाहिजे. धर्माधर्मात मैत्री असली पाहिजे. संतांनी आपल्याला तेच शिकवले आहे. तसा वारसा आपल्याला लाभला आहे. तो विसरून कसा चालेल? पण कधी-कधी आपण माणसाच्या प्रदेशात आहोत की भुतांच्या असा प्रश्न पडतो. कुठल्याही प्रश्नावरून समाजाला वेठीस धरणे, चुकीचे आहे.''

मराठी ही मनाची भाषा

माजी संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचे एकत्रीत पुस्तक यावे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी करून ते म्हणाले, ''पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत आहे. इंग्रजी ही धनाची भाषा समजली जाते. पण मराठी ही मनाची भाषा आहे. ती विसरू नका. मराठी शिकता शिकता इंग्रजी कसे शिकायचे, याचा पर्याय पूर्वीच काढायला हवा होता. यात आपण कमी पडलो. मुलांना मराठी बोलायची, लिहायची सवय लावायला हवी. तर वाचन संस्कृती वाढेल. सध्या खेडोपाड्यात चांगले लेखक तयार होत आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे.'' 

Image may contain: 3 people, people smiling, people standing and flower

ज्यांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती समृद्ध केली त्यांना कमी लेखू नका. जाती-धर्माचे कप्पे पाडू नका. साहित्याचा एकच धर्म आहे, तो म्हणजे चांगले साहित्य. याचा कोणाला विसर पडता कामा नये. 
- ना. धों. महानोर, कविवर्य 

ठाले-पाटील म्हणाले, "मराठी सक्तीची करण्यासाठी कायदा करा. सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची हवी. यासाठी महामंडळाने मुंबईत जाऊन धरणे आंदोलन केले होते. त्यावेळच्या सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता नव्या सरकारने हा कायदा करण्यासाठी पुढाकार घ्यावा."

Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके  

''महामंडळ संमेलनापलीकडे काय करते, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो आणि महामंडळाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हे चुकीचे आहे. संमेलन घेणे हे महामंडळाचे मुख्य काम आहे. महामंडळाच्या चार संस्था साहित्यविषयक कार्य करत आहेत. या संस्थांचा संघ म्हणजे महामंडळ आहे,'' असेही ते म्हणाले. 

साहित्य संमेलनासाठी सरकार निधी देते; पण तेवढ्या निधीत संमेलन होत नाही. त्यामुळे उस्मानाबाद मधील प्रत्येक व्यक्ती दाता झाला. सर्वांच्या मदतीतून हे संमेलन उभे राहिले आहे. महामंडळाने उस्मानाबाद प्रमाणेच लहान लहान शहरातच संमेलने घ्यावी. मोठ्या शहरात अनेक संमेलने झाली. 
- नितीन तावडे, स्वागताध्यक्ष 

माजी संमेलनाध्यक्षांचा झाला सत्कार 

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, अक्षयकुमार काळे, लक्ष्मीकांत देशमुख या माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार साहित्य संमेलनात करण्यात आला. सत्कारासाठी डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, फ. मुं. शिंदे यांनाही बोलावण्यात आले होते. तशा पत्रिका आणि पत्रही त्यांना देण्यात आले होते; पण त्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. माजी संमेलनाध्यक्षांना भाषणासाठी वेळ देण्यात आला नाही. म्हणूनही काहींनी गैरहजर राहण्याला पसंदी दिली. दरम्यान, साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनुराधा पाटील यांचाही विशेष सन्मान या वेळी दिब्रिटो यांच्या हस्ते करण्यात आला.

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर

पुष्पगुच्छ अन चांदीचे पदक 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष हे नियोजित अध्यक्षाला सूत्र प्रदान करतात. पण, हे सूत्र गेली अनेक वर्षे 'अदृश्‍य' स्वरूपात होती. तर मागील एक-दोन संमेलनात ती पुष्पगुच्छ देऊन प्रदान केली जात होती. यंदापासून मात्र, पुष्पगुच्छाबरोबरच चांदीचे पदक देऊन सूत्र प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण हे पदक गुपचूप देण्यात आले. या पदकावर संमेलन स्थळ, संमेलन वर्षे, अध्यक्ष, संमेलनाचे बोधचिन्ह याचा उल्लेख होते.

संमेलनाध्यक्षांना धनादेश प्रदान 

पुण्यात झालेल्या साहित्य संमेलनावेळी शिल्लक राहिलेल्या एकूण रकमेच्या व्याजातील 1 लाख रुपये संमेलनाध्यक्षांना प्रदान केले जातात. पुण्यभूषण आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे हा निधी दिला जातो. संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात पुण्यभूषणचे डॉ. सतीश देसाई, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार यांच्या हस्ते हा निधी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना प्रदान करण्यात आला. 

संमेलनातील क्षणचित्रे 

  • आजारपणामुळे व्हीलचेअर वरून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे व्यासपीठावर आगमन 
  • आई तुळजाभवानीच्या पारंपरिक गोंधळाने संमेलनाला सुरवात 
  • माझी मराठी असे मायभाषा, हे मराठी गीत सादर करून शालेय विद्यार्थीनींनी मिळवली दाद 
  • कुलपती पी. डी. पाटील यांनी संमेलनाला 15 लाखाचा दिला निधी 
  • उदघाटन सोहळ्यात पोत या स्मरणिकेचे आणि कुंभश्री विशेषांकाचे दिब्रिटो यांच्या हस्ते प्रकाशन

संमेलनाध्यक्ष म्हणाले, 'मी पुन्हा येईन' 

अध्यक्षीय भाषण करताना बोलण्याच्या ओघात 'मी पुन्हा येईन' असे फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणाले. आणि एक मोठा पॉज घेतला. त्यावेळी सभागृहात हास्याचा धबधबा उसळला. तो पाहून आपण ते म्हणाले, तुम्ही समजताय त्या अर्थाने मी बोललो नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील काही प्रश्न मला भाषणात मांडायचे होते. त्यासाठी मी पुन्हा येईन, असे म्हणालो, असा खुलासाही त्यांनी केला.

संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे चांदीचे पदकाने प्रदान करणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News Father Francis Deebrito