संमेलनाला जाऊ नका : ना. धों. महानोर यांना ब्राह्मण महासंघाचा फोन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

संमेलनाध्यक्ष म्हणून फादर दिब्रिटो यांना आमचा विरोध आहे. महानोर यांनी या संमेलनाला अनुपस्थित रहावे, असे आवाहनही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियाद्वारे केले जात आहे.

औरंगाबाद : उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक, प्रख्यात कवी, पद्मश्री ना. धों. महानोर यांना "साहित्य संमेलनाला जाऊ नका' असे फोन येत आहेत. वेगवेगळे लोक दररोज फोन करून संमेलनाला न जाण्याच्या सूचना करत आहेत. 

ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे तुम्ही उद्घाटक होऊ नका, असे सांगणारे फोन सातत्याने येत असल्याचे ना. धों. महानोर यांचे नातू शशिकांत महानोर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. मात्र, असे फोन आले तरीही आपण उद्घाटक म्हणून संमेलनाला नक्कीच उपस्थित राहणार असल्याचे महानोर यांनी म्हटले आहे. 

वाचा - भालचंद्र नेमाडे यांना का दिले निमंत्रण?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महानोर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 10) उस्मानाबाद येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याचे जाहीर होताच मोठा वाद उफाळून आला होता.

या संमेलनाचे उद्घाटक असलेल्या महानोर यांनी संमेलनास उपस्थित राहू नये, अशा आशयाचे पत्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने त्यांना पाठवले होते. या महासंघाचेच अध्यक्ष आनंद दवे यांनी फोन करून संमेलनाला जाऊ नका, असे महानोर यांना सांगितले होते. मात्र, तरीही ते जाणार आहेत, असेही शशिकांत महानोर म्हणाले. 

Image result for father francis dibrito
फादर फ्रान्सिस दिब्रिटो

हेही वाचा - फादर फ्रान्सिस दिब्रिटो काय म्हणतात?

संमेलनाध्यक्ष म्हणून फादर दिब्रिटो यांना आमचा विरोध आहे. महानोर यांनी या संमेलनाला अनुपस्थित रहावे, असे आवाहनही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियाद्वारे केले जात आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी महानोर यांना फोन केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News Na Dho Mahanor