आगामी संमेलन मराठवाड्यात?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

लातूर - गेल्या १४ वर्षांत मराठवाड्यात एकही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ शकले नाही, त्यामुळे आगामी साहित्य संमेलन मराठवाड्यात घेण्याच्या हालचाली साहित्य महामंडळात सुरू झाल्या आहेत. त्यातच लातूरमधील एका ग्रंथालयाने महामंडळाकडे निमंत्रण पाठवले आहे, तर उस्मानाबादमधूनही काही संस्थांनी निमंत्रण पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. यापैकी एका ठिकाणी आगामी साहित्य संमेलन होऊ शकते.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या वतीने ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते. वक्ते, सूत्रसंचालक यांच्यासाठी तयार करण्यात आलेले दरपत्रक आणि निमंत्रणवापसी या कारणांमुळे हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले असले, तरी श्रोत्यांच्या अलोट गर्दीमुळे ते यशस्वीही झाले. या संमेलनाचे सूप वाजल्यानंतर आता आगामी साहित्य संमेलनाची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू झाली आहे.

लातूरमधील जिल्हा ग्रंथालय आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेने आगामी संमेलन घेण्याची तयारी दर्शवली आहे, तसे निमंत्रणही त्यांनी महामंडळाला दिले आहे. याबरोबरच बुलडाण्यातील एका ग्रंथालयाने महामंडळाला निमंत्रण दिले आहे, अशी माहिती महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर यांनी ‘सकाळ’ला दिली. या दोन निमंत्रणांबरोबरच उस्मानाबादमधूनही साहित्य संमेलनाचे निमंत्रण महामंडळाकडे येणार आहे.

यापैकी मराठवाड्यातील एका निमंत्रणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. याआधी २००४ मध्ये प्रा. रा. ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादमध्ये संमेलन झाले होते. त्यानंतर मराठवाड्यात संमेलन झाले नाही. त्यामुळे आगामी संमेलन मराठवाड्यातच व्हावे, अशी मागणीही रसिकांमधून होत आहे.

Web Title: Akhil Bhartiy marathi Sahitya Sammelan in Marathwada