शिक्षण, प्रबोधनासाठी नाटक : बागडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

उस्मानाबाद : नाटकांमध्ये कला, कौशल्य तर असतेच; पण शिक्षण, प्रबोधन आणि ऊर्जा प्राप्त करण्यासाठीही नाटकं असतात, असे मत विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने येथील तुळजाभवानी स्टेडियमवर आयोजित तीनदिवसीय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा समारोप रविवारी (ता. 23) श्री. बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 

नाटक हे केवळ करमणुकीसाठीच नाही. करमणुकीचे मार्ग वेगळे आहेत. त्याशिवाय शिक्षण आणि समाजप्रबोधनासाठी नाटक हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत नाटकाची पुढची वाटचाल कशी राहावी, या संदर्भातील मत श्री. बागडे यांनी स्पष्ट केले. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर म्हणाले की, गेल्या 62 वर्षांपासून मी नाट्यक्षेत्रात आहे. त्यापैकी सर्वाधिक नाट्य रसिक उस्मानाबादेत पाहायला मिळाले. ग्रामीण भागांपर्यंत नाटके पोचण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी हे संमेलन ऐतिहासिक आणि अविस्मरणीय झाले असल्याचे सांगितले. 

उस्मानाबाद दुष्काळी, मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो; मात्र हे संमेलन चांगल्या रीतीने पार पाडले. या नाट्य संमेलनासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, असे स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर म्हणाले. 

या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, ज्ञानेश्‍वर पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सहकार्यवाह सतीश लोटके, सुनील वणजू, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी राज्यमंत्री कांबळे, आमदार पाटील यांचीही भाषणे झाली.

नाट्यसंमेलनाचे निमंत्रक धनंजय शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले. पूर्वी भावे व सचिन देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. भोईर यांनी आभार मानले.

Web Title: Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan ends on a high note